IPL 2025 मुंबईचा राजा पावला! क्वालिफायर 2 मध्ये आता पंजाबशी गाठ

मुंबई इंडियन्सला मुंबईचा राजा रोहित शर्मा पावला. रोहित शर्माच्या 81 धावांच्या झंझावाती खेळीने मुंबईच्या विजयाचा पाया रचला. गुजरातविरुद्ध पराभवाचा चौकार झेलणाऱया मुंबईने आज त्याचा सव्याज हिशेब चुकता केला. मुंबईने एलिमिनीटर सामन्यात त्यांचा खेळ खल्लास करत क्वालिफायर-2 मध्ये राजेशाही थाटात धडकही मारली. आता अंतिम सामन्यात बंगळुरूशी भिडण्याआधी 1 जूनला क्वालिफायर- 2 सामन्यात पंजाबचा पाडाव करावा लागणार आहे.

आधी जॉनीचे वादळ, मग रोहितचा दणका आणि शेवटच्या षटकांत हार्दिक पंडय़ाच्या षटकारबाजीने मुंबईला 228 धावांचे आव्हान उभारायला मदत केली. 229 धावांचा पाठलाग करताना ट्रेंट बोल्टने डावाच्या चौथ्याच चेंडूवर शुभमन गिलला पायचीत करत सनसनाटी निर्माण केली. पण यंदा ‘ऑरेंज कॅप’च्या शर्यतीत सर्वात पुढे असलेल्या सुदर्शनने आधी कुसल मेंडिस आणि नंतर वॉशिंग्टन सुंदरबरोबर असे काही चक्र फिरवले की, सामना गुजरातच्या दिशेने वळवला. 28 चेंडूंत 59 धावांचे लक्ष्य असताना सुदर्शन सामना काढणार असेच चित्र मुंबईसमोर उभे राहिले होते. पण तेव्हाच ग्लीसनने सुदर्शनची यष्टी वाकवत सामन्यात गुजरातलाही वाकवले. यानंतर मुंबईने गुजरातला विजयसमीपही फिरकू दिले नाही आणि सामना 20 धावांनी जिंकला.

जॉनीचे दे दनादन

रायन रिकल्टन डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यासाठी लंडनला रवाना झाल्यामुळे मुंबई संकटात सापडली होती. त्यांनी अचानक त्याच्या जागी घेतलेल्या जॉनी बेअरस्टॉने क्रिकेटप्रेमींना सुखद धक्का दिला. मुंबईसाठी पदार्पण करणाऱया जॉनीने रोहित शर्माच्या साथीने सलामीला उतरताच गुजरातच्या गोलंदाजांना दे दणादण चोपले. 22 चेंडूंत 3 षटकार आणि 4 चौकार ठोकत केलेली 47 धावांची खेळी मुंबईच्या डावाला स्फूर्ती देणारी ठरली. त्याने 7 षटकांतच 84 धावांची सलामी दिली.

शर्माजी एलिमिनीटरमध्ये हिट

मुंबईचा शर्माजी एलिमिनीटर सामन्यात हिट ठरला. जॉनीकडून मिळालेल्या ऊर्जेनंतर रोहितने आपल्या लौकिकानुसार गुजरातच्या गोलंदाजांना फोडून काढले. यंदाच्या आयपीएलमधील सर्वोच्च खेळी केल्यानंतर तो शतकही झळकावेल, असे वाटत होता. पण दोन जीवदान मिळाल्यानंतरही तो आपला तीनअंकी टप्पा गाठण्यात अपयशी ठरला. मात्र त्याने 4 षटकारांची आतषबाजी करत 50 चेंडूंत 81 धावा केल्या आणि बाद झाला. त्याने सलामीनंतर सूर्यकुमार यादवसह (33) दुसऱया विकेटसाठी 59 आणि तिलक वर्माबरोबर (25) तिसऱया विकेटसाठी 43 धावांची भर घातली. शेवटच्या षटकांत कर्णधार हार्दिक पंडय़ाने (नाबाद 22) जिराल्ड कोत्झीला तीन षटकार ठोकल्यामुळे मुंबईला 228 पर्यंत मजल मारून दिली. हेच षटक सामन्याला कलाटणी देणारे ठरले.

सलग चार पराभवानंतर विजय

2023 च्या क्वालिफायर 2 मध्ये गुजरातने मुंबईचा पराभव केल्यापासून गुजरात सलग चार सामने जिंकली. या मोसमातही साखळीतील दोन्ही सामन्यात त्यांनी मुंबईचा पराभव करत आपला विजयी चौकार ठोकला होता. आज मुंबईने त्या चारही पराभवांचा वचपा काढताना गुजरातचा आयपीएलचा प्रवास संपुष्टात आणला.