…तर दोन्ही कॅप गुजरातच्याच डोक्यावर, ऑरेंज कॅप सुदर्शन आणि पर्पल कॅप प्रसिध जिंकण्याच्या उंबरठ्यावर

आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत अव्वल स्थानावर असलेल्या गुजरातला साखळीत सलग दोन पराभव सहन करावे लागले आणि त्यांनी अव्वल स्थान गमावले. मग ते एलिमिनिटर सामन्यातही हरले आणि त्याचे स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले. मात्र त्यांचा साई सुदर्शन 759 धावांसह ‘ऑरेंज कॅप’ला आपल्या डोक्यावर घेऊन मिरवतोय तर प्रसिध कृष्णानेही 25 विकेट टिपत ‘पर्पल कॅप’ आपणच जिंकणार असे संकेत दिले आहेत. गुजरातला आपले दुसरे जेतेपद जिंकण्यात यश लाभले नसले तरी त्यांचे सुदर्शन आणि प्रसिध हे दोन्ही खेळाडू सर्वोत्तम फलंदाज आणि गोलंदाजाचा पुरस्कार जिंकून त्यांचे सांघिक अपयश काहीसे कमी करण्याची शक्यता आहे. अंतिम सामन्यात बंगळुरूच्या कोहली आणि हेझलवूडला मोठी कामगिरी करता आली नाही तर या दोन्ही कॅप गुजरातच्या सुदर्शन आणि प्रसिधच्याच डोक्यावर राहणार हे निश्चित आहे.

आयपीएलचा आता केवळ अंतिम सामना खेळायचा बाकी आहे. या शर्यतीतून गुजरात संघ बाद झाला असला तरी साई सुदर्शनने केलेल्या 759 धावा गाठणे अन्य खेळाडूंसाठी जरा कठीण आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असल्यामुळे अंतिम सामन्यात काहीही घडू शकते. 614 धावांसह ‘ऑरेंज कॅप’च्या शर्यतीत असलेल्या विराट कोहलीला दीडशतकी खेळी करून आयपीएलमध्ये पुन्हा एकदा ‘ऑरेंज कॅप’ जिंकण्याचा पराक्रम करता येऊ शकतो. कोहलीने आपल्या 18 वर्षांच्या कारकीर्दीत 2016 आणि 2024 मध्ये ‘ऑरेंज कॅप’ जिंकली आहे. आयपीएल इतिहासात डेव्हिड वॉर्नरने तीनदा ‘ऑरेंज कॅप’ जिंकण्याचा इतिहास रचला आहे. कोहलीला अंतिम सामन्यात दीडशतक ठोकून आपली तिसरी ‘ऑरेंज कॅप’ निश्चित करता येईल.

‘पर्पल’साठी प्रसिधच

गुजरातचा प्रसिध कृष्णा 25 विकेटसह ‘पर्पल’ कॅपचा मुख्य दावेदार असून त्याच्या मागोमाग 21 विकेटसह हेझलवूड आहे. तसेच मुंबईच्या ट्रेंट बोल्ट (21) आणि जसप्रीत बुमरालाही (18) या शर्यतीत येण्याची संधी आहे. तशीच संधी पंजाबच्या अर्शदीप सिंहलाही (18) आहे. फक्त हे संघ अंतिम फेरीत पोहोचले तरच त्यांचे ‘पर्पल’ कॅपचे आव्हान जिवंत राहिल. नाहीतर हेझलवूडला अंतिम सामन्यात प्रतिस्पर्ध्यांचा अर्धा संघ उखडावा लागेल. यात अशक्य असे काहीच नाहीय.

दोन्ही पुरस्कार एकाच संघाला

आयपीएलमध्ये ‘ऑरेंज’ आणि ‘पर्पल’ कॅप एकाच संघाच्या दोन्ही खेळाडूंनी जिंकली, असा पराक्रम चेन्नई, हैदराबाद आणि राजस्थान या संघांना करता आला आहे. 2013 च्या आयपीएलमध्ये माइक हसी (733 धावा) आणि ड्वेन ब्राव्हो (32 विकेट) या चेन्नईच्या खेळाडूंनी अव्वल कामगिरी केली होती. त्यानंतर 2017 मध्ये डेव्हिड वॉर्नर (641) आणि भुवनेश्वर कुमार (23 विकेट) यांनीही हैदराबादसाठी सर्वोत्तम कामगिरी करत दोन्ही पुरस्कार आपल्याकडे राखले. विशेष म्हणजे या दोन्ही स्पर्धांत मुंबईने जेतेपद पटकावले होते. तसेच 2022 च्या आयपीएलमध्ये राजस्थानच्या जोस बटलर (863) आणि युझवेंद्र चहल (27 विकेट) यांनी ‘ऑरेंज’ आणि ‘पर्पल’ कॅप जिंकली होती. आयपीएलच्या गेल्या 17 वर्षांत एकदाही हे दोन्ही पुरस्कार विजेत्या संघाच्या खेळाडूंना अद्याप जिंकता आलेले नाही. हा इतिहास बदलण्यासाठी बंगळुरूच्या विराट कोहली आणि जॉश हेझलवूडला अद्भुत कामगिरी करावी लागेल. अन्यथा दोन्ही पुरस्कार गुजरातच्याच सुदर्शन आणि प्रसिधकडे कायम राहील.