IPL 2025 – मुंबई द्विशतकापार

अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी सज्ज असलेल्या मुंबईने सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांच्या प्रत्येकी 44 धावांच्या खेळीमुळे पंजाबसमोर 204 धावांचे आव्हान ठेवले.

पावसाच्या व्यत्ययामुळे सवादोन तास उशिरा सुरू झालेल्या सामन्यात आज रोहित शर्माला सूर गवसला नाही. मात्र जॉनी बेअरस्टॉने आजही तडाखेबंद सलामी देताना 38 धावा चोपून काढल्या. तो बाद झाल्यानंतर बढती मिळालेल्या तिलक वर्माच्या साथीने सूर्यकुमार यादवने पंजाबच्या गोलंदाजीला फोडून काढले. दोघांच्या फटकेबाजीमुळे मुंबई सवादोनशेचा टप्पा सहज ओलांडण्याची चिन्हे दिसत होती. पण 14 व्या षटकात युझवेंद्र चहलने सूर्याची खेळी संपवत पंजाबला मोठे आणि महत्त्वाचे यश मिळवून दिले. मग कायल जेमीसनने आपल्या पहिल्याच चेंडूवर तिलक वर्माच्या खेळीचाही अंत करत तीन चेंडूंत मुंबईच्या दोन्ही फलंदाजांना तंबूत धाडले. सूर्याने आजही 44 धावांची खेळी करत सुदर्शनच्या 759 धावांचा पाठलाग करताना 717 धावांपर्यंत मजल मारली. तो मुंबईकडून 700 पेक्षा अधिक धावा काढणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे.

पाच षटकांची बरसात करणारे दोघेही बाद झाल्यानंतर मुंबईच्या धावांची गतीही मंदावली. हार्दिक पंड्याकडून धावांचा वेग वाढवण्याची अपेक्षा होती, पण तो 13 चेंडूंत केवळ 15 धावाच करू शकला. पण नमन धीरने 18 चेंडूंत 7 चौकारांची फटकेबाजी करत मुंबईला द्विशतकासमीप नेले. राज बावाने शेवटच्या चेंडूवर तीन धावा पळून काढत मुंबईला 203 धावांपर्यंत नेले.

सूर्यकुमार यादवचा जोरदार पाठलाग

सुदर्शनची ‘ऑरेंज’ कॅप जवळजवळ निश्चित मानली जात आहे. तरीही त्याच्या मागोमाग असलेला सूर्यकुमार यादव (717)आहे. पंजाबविरुद्ध सामन्यात त्याने 44 धावांची झंझावाती खेळी करत सुदर्शनच्या 759 धावांना आव्हान जोरदार आव्हान दिले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आयपीएलचा अंतिम सामना मुंबई विरुद्ध बंगळुरू असा रंगला तरी सूर्या सुदर्शनच्या डोक्यावर चिकटलेली ‘ऑरेंज’ कॅप उडवू शकतो. पण सूर्याचे भवितव्य मुंबईचा संघ अंतिम फेरीत पोहोचल्यावर बदलू शकते.

सूर्यकुमार तिसराच

सूर्यकुमारने 44 धावा करताना आज 700 धावांचा टप्पा गाठत मुंबईसाठी एका मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रचला. पण त्याचबरोबर तो 700 धावा करणारा तिसराच बिगरसलामीवीरही ठरला. आयपीएल इतिहासात सलामीवीरांच्या व्यतिरिक्त माइक हसीने तिसऱया आणि चौथ्या स्थानावर खेळताना 2013 साली 733 आणि केन विल्यमसनने 2018 साली 735 धावा केल्या आहेत. त्याचप्रमाणे आयपीएल इतिहासात 700 पेक्षा अधिक धावा करण्याचीही 12वी वेळ आहे. फक्त विराट कोहलीने ही किमया दोनदा साधली आहे.