
जगभरातील क्रीडाप्रेमींचे लक्ष लागलेल्या इ़ंडियन प्रीमिअर लीगचा (आयपीएल 2021) 14 वा हंगाम सुरू होण्यास अवघा चार दिवसांचा कालावधी बाकी आहे. 9 एप्रिलला मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघामध्ये शुभारंभाचा सामना खेळला जाईल. चेन्नईमध्ये हा सामना रंगणार आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 6 शहरांमध्ये ही स्पर्धा होत आहे.
मर्यादित षटकांच्या या स्पर्धेमध्ये सर्वांचे लक्ष फलंदाजाच्या धडाकेबाज कामगिरीकडे असते. मात्र अनेकदा फलंदाज-गोलंदाज नाही तर क्षेत्ररक्षक मन जिंकून जातात. आयपीएलमध्ये आतापर्यंत अनेक सुपरडुपर कॅच तुम्ही पाहिले असतील. किरोन पोलार्ड, निकोलस पूरन, एबी डिव्हिलिअर्स, सुरेश रैना, विराट कोहली हे यात आघाडीवर आहेत. मात्र यापैकी फक्त सुरेश रैना यालाच आतापर्यंत कॅचचे शतक साजरे करता आले आहे.
गेल्या वर्षी आयपीएलला मुकलेल्या सुरेश रैना याने आपल्या 13 वर्षाच्या कारकीर्दीमध्ये 192 लढतीत 102 कॅच घेतले आहेत. आयपीएलमध्ये कॅचचे शतक ठोकणारा तो एकमेव खेळाडू आहे.
पोलार्डची नव्वदी

वेस्ट इंडिजचा खमक्या खेळाडू आणि मुंबई इंडियन्सचा खेळाडू किरोन पोलार्ड याने आतापर्यंत आयपीएलमध्ये अनेक अश्विसनीय कॅच घेतले आहेत. रैनानंतर सर्वाधिक कॅच घेण्यात पोलार्डचाच नंबर लागतो. त्याने आतापर्यंत 164 लढतीत 90 कॅच घेतले आहेत.
रोहितही कमी नाही

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माही क्षेत्ररक्षणात कमी नाही. त्याने आतापर्यंत 200 लढतीत 89 कॅच घेतले आहेत.
एबीचा ‘सुपर’ शो

मैदानावर चौफेर फलंदाजी करणारा एबी डिव्हिलिअर्स क्षेत्ररक्षणातही सुपर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणाऱ्या डिव्हिलिअर्सने 122 लढतीत 83 कॅच घेतले आहेत.
विराटचा पाचवा नंबर

टीम इंडियाचा कर्णधार आणि आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे नेतृत्व करणारा विराट कोहली या यादीत पाचव्या स्थानावर आहे. विराट कोहली याने 190 लढतीत 76 कॅच घेतले आहेत.




























































