ठाणे-नागपूर तुरुंगांचे स्थलांतर, राज्यातील तुरुंगांच्या जागा खासगी क्षेत्राला देण्याचा सरकारचा मनसुबा? सुप्रिया सुळे यांचा सवाल

राज्यातील तुरुंगांच्या जागा खासगी क्षेत्राला देण्याचा या सरकारचा मनसुबा आहे का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारला विचारला आहे. त्यांनी एक X वर एक पोस्ट करत हा प्रश्न विचारला आहे.

X वर पोस्ट करत सुप्रिया सुळे म्हणाली आहेत की, “राज्यातील तुरुंगांच्या जागा खासगी क्षेत्राला देण्याचा या सरकारचा मनसुबा आहे का? ठाणे, नागपूर यांसह काही महत्वाच्या शहरांतील तुरुंग शहराबाहेर इतरत्र नेण्याच्या हालचाली सुरु आहेत. राज्यातील अनेक तुरुंगांना ऐतिहासिक वारसा आहे. काही वास्तू तर स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित आहेत. याखेरीज तुरुंगांच्या जागा बदलल्या तर कैद्यांना न्यायालयात आणणे अधिक जिकीरीचे होईल याखेरीज कैद्यांच्या कुटुंबियांना देखील त्यांची भेट घेणे अवघड होईल.

त्या म्हणाल्या की, “तुरुंगाच्या नियोजन व देखभालीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांसाठी देखील मुलांच्या शाळा आणि इतर सुविधांच्या बाबतीत अडचणी निर्माण होऊ शकतात. शासनाने याबाबत तातडीने खुलासा करणे गरजेचे आहे. जर असा काही निर्णय घेतला जात असेल किंवा त्याबाबतच्या हालचाली सुरू असतील तर तुरुंगाच्या मूळ जागेचे काय करणार याबाबत स्पष्टता येणे गरजेचे आहे.”