
पॅलेस्टाईनची दहशतवादी संघटना हमासविरोधात इस्रायलने युद्धघोषणा केली आहे. या युद्धाला आता दोन आठवडे लोटले असून इस्रायली नागरिकांचा इस्रायल सरकारविरोधात रोष वाढू लागला आहे. हमास दहशतवाद्यांनी कैद केलेल्या नागरिकांना सोडवण्याची मागणी करणारं आंदोलन इस्रायलच्या नागरिकांनी छेडलं आहे.
शनिवारी रात्री आपल्या विविध मागण्यांसाठी इस्रायली नागरिक राजधानीचं शहर असलेल्या तेल अवीव येथे जमले होते. हमास दहशतवाद्यांनी कैद केलेल्या अनेक नागरिकांचे नातेवाईकही त्यात सहभागी झाले होते. त्यांनी यावेळी आपलं म्हणणं नेतन्याहू सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
हमासने पळवून नेलेल्या युद्धकैद्यांना सोडवून आणण्याची मागणी इस्रायली नागरिक करत आहेत. आमचा त्यांच्याशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. त्यांच्या जिवंत असण्याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. आता दोन आठवडे उलटून गेल्यानंतर आमचे 200हून अधिक नागरिक ओलीस ठेवण्यात आले आहेत आणि आता आमच्या आयुष्याचा नरक होत आहे. हीच मागणी सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही एकत्र जमलो आहोत, असं या आंदोलकांचं म्हणणं आहे.




























































