इस्रोचे EOS-09 मिशन अपूर्ण; तांत्रिक बिघाडामुळे रॉकेट तिसरा टप्पा पार करण्यात अयशस्वी

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) पीएसएलव्ही-सी 61 रॉकेटची शनिवारी झालेली प्रक्षेपण मोहीम यशस्वी झाली नाही. प्रक्षेपणानंतर तिसऱ्या टप्प्यात तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे मोहीम अपूर्ण राहिली, अशी माहिती इस्रो प्रमुख व्ही. नारायणन यांनी दिली. व्ही. नारायणन म्हणाले की, उपग्रह प्रक्षेपणाचा पहिला आणि दुसरा टप्पा यशस्वी झाला. मात्र, तिसऱ्या टप्प्यादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने तो टप्पा पूर्ण होऊ शकला नाही. तांत्रिक दोषामुळे ही मोहीम यशस्वी झाली नाही, असे त्यांनी सांगितले.

मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात तांत्रिक बिघाड निर्माण झाला आणि मोहीम पूर्ण होऊ शकली नाही. आता आम्ही या डेटाचे विश्लेषण करू आणि त्यानंतर पुन्हा ही मोहिम राबवली जाईल . या मोहिमेअंतर्गत, EOS-09 (पृथ्वी निरीक्षण उपग्रह-09) पृथ्वीच्या सूर्य समकालिक कक्षेत (SSPO) ठेवले जाणार होते. हा उपग्रह EOS-04 ची पुनरावृत्ती आवृत्ती होता आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्या वापरकर्ता समुदायाला अचूक आणि नियमित डेटा प्रदान करण्यासाठी रिमोट सेन्सिंग डेटा प्रदान करण्याचा हेतू होता.

देशाच्या रिमोट सेन्सिंग क्षमतांना अधिक बळकटी देण्याच्या उद्देशाने EOS-09 उपग्रहाची रचना करण्यात आली आहे. EOS-09 विशेषतः दहशतवादविरोधी कारवाया, घुसखोरी किंवा संशयास्पद हालचाली शोधण्यासाठी डिझाइन केले होते. प्रक्षेपण दरम्यान कोणत्या टप्प्यावर समस्या उद्भवली आणि भविष्यात ती कशी दुरुस्त करता येईल हे शोधण्यासाठी इस्रोची तांत्रिक टीम आता या समस्येची सविस्तर चौकशी करेल, असेही त्यांनी सांगितले.