
जळगाव सुवर्णनगरी म्हणून ओळखली जाते. मात्र येथे काही दगड निपजले. शिवसेनेच्या सभेत घुसू अशी धमकी गद्दारांनी दिली. मात्र छातीत हिम्मत लागते. गद्दारांमध्ये ती नाही. घुसून दाखवा म्हणे. घुसलो की, इथपर्यंत आलो. अजून किती घुसायचे, अशा शब्दांत घणाघात करीत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी कडवट शिवसैनिकांच्या नादी लागू नका, असा इशाराही मिंधे सरकारला दिला.
आजच्या सभेने निकाल दिला की, पाचोरा कोणाचे आहे. या सभेने निकाल दिला आहे की, पाचोरा निष्ठावंत आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निष्ठा ठेवणाऱया शिवसैनिकांचा आहे. या जळगावात गुलाबो गँग स्थापन झाली आहे. 200 कोटी रुपये आले आहेत. या 50-50 खोकेवाल्यांचा आपण चांगलाच बंदोबस्त करू, अशा शब्दांत त्यांनी सुनावले. आर.ओ. तात्यांनंतर वैशाली सूर्यवंशी या वारसा चालवतील. पुतण्यांनी राज्यात फार घोटाळा केलाय. पाचोऱयातही एका पुतण्याने ते केले आहे. मात्र लोकसभा व विधानसभेवर भगवाच फडकेल, असा ठाम विश्वासही खासदार राऊत यांनी क्यक्त केला.
तात्यांचा अन् शिवसेनेचा वारसा
बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आर.ओ. तात्यासाहेबांच्या रूपाने पहिला आमदार पाचोऱयाला मिळाला. मग तालुक्यात विकासाची घोडदौड सुरू झाली. उद्योग-व्यवसायातही तात्यांनी भरारी घेतली. शिवसेनेने भरभरून दिले, मात्र तात्यांच्या घरात गद्दारी निघाली. पुतण्याने तत्त्वांशी प्रतारणा केली असली तरीही आपण शिवसैनिक मात्र तात्यांचा अन् शिवसेनेचा वारसा पुढे नेणार आहोत, असे प्रतिपादन शिवसेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी केले.





















































