अष्टपैलू रवींद्र जाडेजाला दुखापत; आशिया चषकातून आऊट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आशिया चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेतील सुपर-4 च्या फेरीला प्रारंभ होण्यापूर्वी टीम इंडियाला एक मोठा धक्का बसला. त्यांचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा हा गुडघ्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी अक्षर पटेलला हिंदुस्थानी संघात स्थान देण्यात आले आहे. अक्षर पटेल हा राखीव खेळाडू म्हणून आधीच संघासोबत यूएईला गेलेला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यात जाडेजाने 29 चेंडूंत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 35 धावांची बहुमोल खेळी केली होती. गोलंदाजीत त्याने 2 षटकांत केवळ 11 धावा दिल्या होत्या. हाँगकाँगविरुद्धच्या दुसऱया साखळी सामन्यात जाडेजाने 4 षटकांत केवळ 15 धावांच्या मोबदल्यात 2 बळी टिपले होते. शिवाय फ्री हिटवर जबरदस्त थ्रो करून एका फलंदाजाला धावबादही केले. त्यामुळे अक्षर पटेलकडूनही आता जाडेजाच्या गैरहजेरीत अशीच अष्टपैलू कामगिरी अपेक्षित आहे.