
भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक शनिवारी संध्याकाळी झाली. या बैठकीत उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी पत्रकार परिषद घेत पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड हे एनडीएकडून उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील, अशी घोषणा केली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते.
पश्चिम बंगालचे राज्यपाल धनखड यांनी शनिवारी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. तसेच शुक्रवारी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. उपराष्ट्रपतीपदासाठी 6 ऑगस्टला मतदान होणार असून त्याचदिवशी मतमोजणीही होणार आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्टला संपत आहे.





























































