जालन्यात 20 जानेवारीपासून ’भीम फेस्टीव्हल’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। जालना

जालना शहरातील अंबड चौफुलीनजीक जांगडेनगरात 20 ते 22 जानेवारी या कालावधीत भीम फेस्टीव्हल आयोजित करण्यात आले आहे. हे फेस्टीव्हल गणेश फेस्टीव्हलच्या तोडीस-तोड असून, जालना शहर व जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रसिकांनी या फेस्टीव्हलचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक तथा राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी केले. जूना जालना,भाग्यनगर स्थित संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी जि.अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, उपजिल्हाप्रमुख पंडीतराव भुतेकर, शहरप्रमुख विष्णु पाचफुले, शिवसेना दलित आघाडीचे अ‍ॅड.भास्कर मगरे, भाऊसाहेब घुगे, निखिल पगारे, आदींची उपस्थिती होती.पुढे बोलतांना खोतकर म्हणाले, भीम फेस्टीव्हलमध्ये शिवाजी महाराज-महात्मा फुले-अण्णाभाऊ साठे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा जागर होणार आहे. 20 जानेवारीला सकाळी 10 वाजता बहुजन समाजासाठी कार्य केलेल्या थोर व्यक्तींचे रेखाचित्र महाचित्रकला स्पर्धा, सायंकाळी 5 वाजता भीम फेस्टीव्हलचे उद्घाटन, सायंकाळी 7 वाजता विद्रोही शाहीरी जलसा, 21 जानेवारीला सकाळी 10 वाजता बहुजन समाजासाठी कार्य केलेल्या थोर व्यक्तींचे रांगोळी चित्र महारांगोळी स्पर्धा, सायंकाळी 7 वाजता महासुर्य महानाट्य, 22 जानेवारीला सकाळी 10 वाजता महाआरोग्य शिबीर, सायंकाळी 7 वाजता आदर्श शिंदे यांचा भीम गीत आर्केस्ट्रा होणार असल्याचेही खोतकर यांनी सांगितले. फेस्टीव्हलमध्ये सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या सामाजिक कार्यकत्र्यांचा गौरवही यावेळी करणार असल्याचे राज्यमंत्री खोतकर सांगितले.