
भाजप सरकारने राबविलेल्या जलयुक्त शिवार अभियानासंदर्भातील तक्रारींची खुली चौकशी करण्याची शिफारस समितीने केली आहे. त्या समितीचा अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, राज्यात मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना लागू केली असून, यातून नगर जिल्ह्यातील बंधारे दुरुस्त केले जाणार आहेत. त्याचा अहवाल एका महिन्यात देण्याचे आदेश येथील प्रशासनाला दिल्याचेही त्यांनी सांगितले. नगर जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात मंत्री गडाख यांनी जलसंपदा, जलसंधारण, पाणीपुरवठा आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्य़ांची आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
मागील सरकारच्या माध्यमातून जलयुक्त शिवार अभिनयाची कामे करण्यात आली होती. त्या कामांसंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याबाबत कॅगने अहवाल दिल्यानंतर या योजनेमध्ये झालेल्या कामांपैकी 70 टक्के कामांमध्ये अनियमितता असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यातून दोन हजार कामांची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या प्रकरणाची खुली चौकशी करावी, अशी शिफारस समितीने सरकारकडे केली होती. कामाचा दर्जा तसेच निकष या सर्व बाबींची पडताळणी करून ती समिती आपला अहवाल देणार आहे. 1100 ते 1200 कामांची चौकशी होणार आहे.
संबंधित समितीने अहवाल दिल्यानंतर त्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल. जलसंधारण विभागाकडून या अभियानावर नऊ हजार कोटी रुपयांचा खर्च झाला होता. मात्र, अनेक जिल्ह्यातून या कामांच्या तक्रारी आलेल्या होत्या; पण कामांची संख्या मोठी असल्यामुळे सर्वच कामांची चौकशी न करता समितीने अंतिम अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाणार असल्याचेही मंत्री गडाख यांनी सांगितले.
राज्यातील सर्व बंधाऱ्य़ांची होणार दुरुस्ती
राज्यामध्ये ‘मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, याअंतर्गत राज्यातील सर्व बंधारे दुरुस्त केले जाणार आहेत. यामध्ये कृषी विभाग, जिल्हा परिषद, जलसंधारण विभाग यांसह इतर विभाग आहेत. त्या विभागाच्या अंतर्गत येणारे केटीवेअर बंधारे, मध्यम बंधारे, मोठे बंधारे यांचा यामध्ये समावेश आहे. दोन महिन्यांमध्ये हे बंधारे दुरुस्त करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. एकूण 13 ते 14 हजार बंधारे दुरुस्ती करावे लागणार आहेत. कोरोनामुळे निधीची कमतरता आहे. मात्र, याकरिता 1600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, दोन वर्षांमध्ये हे बंधारे दुरुस्तीचे काम पूर्णत्वाला नेले जाणार आहे.
नगर जिल्ह्यातील 8 हजार योजनांची दुरुस्ती होणार
नगर जिल्ह्यात या योजनेअंतर्गत मार्च 2023पर्यंत साधारणतः सात हजार 916 योजनांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. यात लघुसिंचन तलाव, साठवण तलाव, गावतलाव, पाझरतलाव, मातीनाला बांध, सिमेंटनाला बांध, साठवण बंधारे, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आदींची विशेष दुरुस्तीची कामे करण्यात येणार असल्याचे मंत्री गडाख म्हणाले. यासंदर्भात ज्या यंत्रणांच्या अधिपत्याखाली सदर प्रकल्प आहेत, त्यांनी विशेषतः दहा वर्षे जुने झालेल्या प्रकल्प, त्यानंतरचे प्रकल्प अशी वर्गवारी करून दुरुस्ती अत्यावश्यक असलेल्या प्रकल्पांचा आराखडा सादर करण्याची सूचना त्यांनी केली.

























































