आता विचारांची लढाई जिंकायची – रोहित पवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। जामखेड

चार राज्यांमध्ये सत्ता परिवर्तन झाले आहे. हेच युतीचे सरकार यामध्ये अपयशी ठरले असून मागील निवडणुकीत हे सरकार खोटे बोलून सत्तेत आले असल्यामुळे येत्या निवडणुकीत जनताच त्यांना चांगला धडा शिकवेल. आता सर्वांनी एकत्र येऊन ही विचारांची लढाई विचारांनी लढायची असे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषद सदस्य रोहीत पवार यांनी जामखेड येथील कार्यकर्ता संवाद मेळाव्याप्रसंगी व्यक्त केले. यावेळी दोन वर्षांपासून रिक्त असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जामखेड तालुका अध्यक्ष पदी दत्तात्रय वारे तर कर्जत जामखेड विधानसभा अध्यक्ष पदी मधुकर राळेभात यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून या निवडीचे पत्र उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिका-यांना प्रदान करण्यात आले आहे.

जामखेड येथील साई गार्डन मंगल कार्यालयात सोमवार 18 मार्च रोजी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुणे जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहीत पवार बोलत होते. यावेळी पक्षनिरीक्षक किशोर मासाळ, प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी,माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर राळेभात, दत्तात्रय वारे, शरद भोरे, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले, डॉ. कैलास हजारे, डॉ. इंद्रकुमार भिसे, संध्या सोनवणे, अमजद पठाण, संजय वराट, नितीन गोलेकर, अमित जाधव, डिंगाबर चव्हाण, अॅड हर्षल डोके, डॉ. अविनाश पवार, प्रदीप पाटील, सुनिल कोठारी, नरेंद्र जाधव, प्रशांत राळेभात, विजय पवार, जालिंदर राळेभात, प्रकाश काळे, बबन देवकाते, आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी रोहित पवार म्हणाले की, मराठा, मुस्लीम व धनगर समाजाला आरक्षण देणार अशा फसव्या घोषणा भाजप सरकारने केल्या.फक्त आरक्षणाचे गाजर दाखवले या सर्व समाजाची फसवणूक केली. आता सर्वांनी एकत्र येऊन गटतट बाजुला ठेऊन एकत्र यायचे आहे. तसेच आपले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अवधूत पवार यांच्यावर हल्ला झाला कारण मंत्र्यांच्या विरोधात सोशल मिडीयावर पोस्ट टाकली म्हणून. एवढी मोठी दहशत जामखेड मध्ये मंत्र्यांची आहे. त्यामुळे असे हल्ले झाले तर आपल्या शंभर कार्यकर्त्यांनी हल्ला झालेल्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.तरच जामखेड मधील दहशत कमी होईल. विरोधात बोलले की आवाज बंद करण्याचे काम सद्या जामखेड मध्ये सुरू असल्याचे पवार यांनी सांगून चोंडी येथील आंदोलनातील काही आंदोलक हे शिक्षण घेत असल्याने त्यावरील कलम रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे देखील रोहीत पवार यांनी यावेळी सांगितले. या मेळाव्यात बुथ कमिटी बाबत अनेक मान्यवरांनी कार्यकर्त्यांना सविस्तर माहिती दिली. यावेळी तालुक्यातील हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जामखेड तालुका अध्यक्ष पदी दत्तात्रय वारे तर कर्जत जामखेड विधानसभा अध्यक्ष पदी मधुकर राळेभात यांची बिनविरोध निवड करण्यात येवून या दोन्ही नवनिर्वाचित पदाधिका-यांना या निवडीचे पत्र उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. चोंडी येथे धनगर आरक्षणाची मागणी करण्या-या 18 आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सर्व आंदोलकांचा या मेळाव्यात सन्मान करण्यात आला.