
राज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर शिंदे सरकार जरी वाचलं तरी त्यांना सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांसमोर व्यक्त केले. राज्यपालांनी घेतलेले सर्व निर्णय कसे चुकीचे आहेत हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. भरत गोगावले यांचा व्हीप अमान्य केला असल्याने विधानसभेतील शिवसेनेच्या सदस्यांनी जी कृती केली ती अवैध ठरणार आहे. त्यामुळे विधानसभेच्या अध्यक्षांना निर्णय घेताना सर्वोच्च न्यायालयाने ज्या मुद्यांची नोंद केली त्या चौकटीत राहून काम करावे लागेल असे ते म्हणाले. यामध्ये विधानसभा अध्यक्ष वेळकाढूपणाचे धोरण करू शकणार नाही.
शिंदे सरकार वाचलं हा सत्तेच्या भोवती गोळा झालेल्यांचा क्षणिक आनंद राहू शकतो. कसे बसे शिंदे सरकार वाचले ही आनंदाची भावना त्यांची राहू शकते. पण हे सर्व अवैध, घटनाबाह्य आहे. यातून भाजपने महाराष्ट्रात केलेली कृती कशी चुकीची आहे. तसेच घटेनेची पायमल्ली कशाप्रकारे झाली हे राज्यातील जनतेला सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. राज्यातील सर्व राजकीय परिस्थिती पाहून उद्धव ठाकरे यांनी राजिनामा दिला नसता तर महाविकास आघाडीला पुन्हा सत्तेत बसण्याची संधी मिळाली असती असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. यातून सर्वोच्च न्यायालयाच्या मनात काय होते हे स्पष्ट होते.
तत्कालीन राज्यपालांच्या भूमिकेवर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले यावर जयंत पाटील म्हणाले की, राज्यपालांना जसा माणूस भेटेल तसे ते मार्गदर्शन करत होते. राज्यपाल स्थरावरील व्यक्तीबद्दल असे बोलणे योग्य नसले तरीही त्यांची चोवीस तास अशीच भूमिका होती. त्यांना योग्य संधी मिळाली तेव्हा कायद्याची पायमल्ली करून आमचं सरकार घालवण्यासाठी राज्यपाल महोदयांनी फार मोठा हातभार लावला असा थेट आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.
राज्यातील सरकार हे बेकायदेशीर आहे हे सिद्ध झाल्याने राज्यात सत्ता कोणाची हे जनतेला महत्वाचे नाही. या निर्णयामुळे राज्यातील जनता महाविकास आघाडीच्या मागे खंबीरपणे होती त्याला अधिकची शक्ती मिळेल, असा विश्वास प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंत एकनाथ शिंदे यांच्याकडून नैतिकतेची अपेक्षा करणे जास्त चुकीचे होईल असे वाटते. ज्यावेळी त्यांनी सरकार स्थापन केले त्यावेळी कोणतीही नैतिकता नव्हती. त्यामुळे पुन्हा त्यांच्यावर नैतिकतेबद्दल बोलणे योग्य वाटत नाही, असे ते म्हणाले.




























































