
राष्ट्रवादीतून फुटलेल्या अजित पवार गटाला पक्षाचं नाव आणि घड्याळ हे चिन्ह देण्यात येत असल्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. हा निर्णय धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी दिली आहे. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
निवडणूक आयोगाचा हा निर्णय धक्कादायक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय @PawarSpeaks साहेबांच्या हातातून पक्ष हिसकावून घेतला जातोय. देशातील जवळपास सर्वच संविधानिक संस्थांनी स्वायत्तता गमावली असल्याने तर्कहीन निर्णय देऊन तांत्रिक कारणे पुढे केली…
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) February 6, 2024
एक्स या समाज माध्यमावर पोस्ट लिहून त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते लिहीतात की, निवडणूक आयोगाचा हा निर्णय धक्कादायक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हातातून पक्ष हिसकावून घेतला जातोय. देशातील जवळपास सर्वच संविधानिक संस्थांनी स्वायत्तता गमावली असल्याने तर्कहीन निर्णय देऊन तांत्रिक कारणे पुढे केली गेलेली सकृतदर्शनी दिसत आहे. या निकालाचा सविस्तर अभ्यास करुन आम्ही त्यावर भाष्य करू. या निकालाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असून देशाचे सर्वोच्च न्यायालय आम्हाला न्याय देईल याची आम्हाला खात्री आहे, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे.

























































