
चंद्रपूर जिल्ह्यात एक विचित्र अपघात घडला आहे. विहिरीचे खड्डे बुजवून परत येणाऱ्या जेसिबीचा चालक जमिनीवर कोसळून त्याच्या डोक्यावरून जेसीबी गेल्याने चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मात्र, चालकविरहीत असलेली जेसीबी जवळपास एक किमी अंतरावर जाऊन थांबली. हा विचित्र अपघात धाबा गावापासून चार किमी अंतरावर असलेल्या चेक सोमणपल्ली शेतशिवारात शुक्रवारी सहा वाजताचा सुमारास घडला. तिरूपती बोबाटे असे मृत चालकाचे नाव आहे. तो तेलंगणातील टोकनी पारगाव येथील रहिवासी होता.
गोंडपिपरी तालुक्यात विविध योजने मार्फत विहीरी मंजूर झाल्या. या विहीरींची बांधकामे झाली आहेत. विहीरीसाठी खोदकाम करताना निघालेली माती जेसीबीचा साहाय्याने दुसरीकडे टाकण्याचे काम सुरू आहे. पोडसा येथील प्रवीण घ्यार याच्या मालकीच्या विहिरीवरही शुक्रवारी दिवसभर जेसीबीने माती बुजविण्याचे काम सुरू होते. सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान काम आटोपल्यावर जेसीबी घेऊन चालक तिरुपती बोबाटे घराकडे निघाला होता. घराकडे निघालेली जेसीबी अचानक मागे आली आणि तिरुपती जमिनीवर कोसळला. जेसीबीचे चाक तिरुपतीच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. चालकविरहीत असलेली जेसीबी जवळपास एक किमी अंतरावर जाऊन थांबली. घटनेची माहिती धाबा पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.




























































