
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या मालिकेतील एका अभिनेत्रीने मालिकेचे निर्माते असित मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसंच, या मालिकेलाही रामराम ठोकला आहे.
या अभिनेत्रीचं नाव जेनिफर मिस्त्री बन्सीवाल असं आहे. मालिकेत रोशन या भूमिकेत ती दिसते. तिने सुमारे 15 वर्षांनंतर ही मालिका सोडली आहे. तिने मालिका सोडण्यापूर्वी निर्माता असित मोदी, प्रोजेक्ट हेड सोहेल रमानी आणि कार्यकारी निर्माता जतिन बजाज यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

असित मोदी यांनी आपला मानसिक आणि लैंगिक छळ केला आहे. सुरुवातीपासूनच असित हे आपल्याशी लाळघोटेपणा करत असत. मोकळेपणाने प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर त्यांनी आपल्याला वारंवार दारूची ऑफर द्यायला सुरुवात केली. 2019मध्ये सिंगापूर येथे मालिकेच्या चित्रीकरणावेळीही त्यांनी आपल्याला दारू पिण्यासाठी खोलीत बोलवलं. त्यानंतर काही दिवसांनी आपल्याकडे बघून प्रतिक्रिया दिली आणि आपलं चुंबन घ्यायची इच्छा झाल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं. अनेक वर्षं याबाबत गप्प राहिल्यानंतर आपल्या वकिलांच्या सांगण्यावरून आपण खरी बाजू सांगण्याचं ठरवलं, असंही जेनिफरचं म्हणणं आहे.
दरम्यान, असित मोदी यांनी आपल्यावरील आरोप हे खोटे असल्याचं म्हटलं आहे. ही मालिका वादात सापडण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही मालिकेत दाखवलेल्या एका भागावर शीख बांधवांनी नाराजी व्यक्त केली होती.



























































