
महाराष्ट्रात सतत वणवा पेटवण्याचा प्रयत्न केला जात असून, धर्माची गोळी दिली तर लोक झोपून राहतात हे माहीत असल्यानेच त्यांना गोळी देऊन झोपविले जात असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर केली. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना सतत बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असून, आमच्या बापाची बदनामी होत असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
गृहनिर्माण मंत्री आव्हाड एका कार्यक्रमासाठी आज कोल्हापूर दौऱयावर आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. हल्ली राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रत्येक मुद्दय़ात ओढून-ताणून आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. कारण धर्मांध शक्तींना रोखणारा शरद पवार हा एकच हिमालय असल्याचे विरोधकांना माहिती आहे. त्यामुळे महात्मा गांधी यांच्याप्रमाणे आता पवार यांना बदनाम केले जात असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, आर्यन खानबाबत बोलताना त्यांनी तपास यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.





























































