
सामना प्रतिनिधी । परभणी
परभणी ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील एका कर्मचाऱ्यास ५९० दिवस रजेचे शिल्लक असताना रजा परिवर्तीत करण्यासाठी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करत ८ हजारावर तडतोड करणारा उपकार्यकारी अभियंता युनूस खान इब्राहिम खान (५४)यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया उशिरापर्यंत चालू होती.
या प्रकरणी ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील एका कर्मचाऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे स्वत: उपस्थित राहून तक्रार दाखल केली. या तक्रारीत त्यांची वैद्यकीय रजा मंजुर करण्यासाठी उपकार्यकारी अभियंता ही रजा मंजुर करत नव्हते. या अभियंत्याने तक्रारदाराकडे १० हजार रुपयांची लाचेची मागणी केली. ही मागणी केली असता तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागास कळविले. या प्रकारावरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्रशासकीय इमारतीच्या परिसरामध्ये सापळा रचला. आज ३ रोजी प्रशसकीय इमारतीच्या समोर दर्गाह हजरत सय्यद असुद शाह कमानीच्या समोर भर रस्त्यावर पंचा समक्ष लाच स्वीकारत असताना या विभागाने पकडले. लाचेची रक्कम ८ हजार रुपये पोलिसांनी आरोपीसह हस्तगत केली.
या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल करुन ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालयातील उप कार्यकारी अभियंता युनूस खान इब्राहीम खान यास ८ हजार रुपये लाच घेतली असल्याचे म्हटले आहे. ही कारवाई नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक संजय लाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक रवींद्र थोरात, पोलीस निरीक्षक अनिल गव्हाणकर, विवेकानंद भारती यांनी अविनाश पवार, अनिल कटारे, लक्ष्मण मुरकुटे, चट्टे, मुखीद, चौधरी, बोके यांनी सहकार्य केले. यावेळी परभणी जिल्ह्यातील नागरिकांना भ्रष्टाचाराच्या विरोधात काही तक्रारी असल्यास तात्काळ लाचलुचपत विभागाशी संपर्क साधवा, असे आवाहनही करण्यात आले आहे.


































































