नांदेडच्या सारखीत सराफा दुकान फोडले; तिजोरीसह 15 लाखांची चोरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । नांदेड

सारखी येथे सलग दुसऱ्या दिवशी चोरी झाली असून एक सराफा दुकान फोडून चोरट्यांनी 14 लाख 94 हजार 875 रुपयांचा ऐवज तिजोरीसह चोरून नेला आहे. सारखी येथील सराफा व्यापारी शाम कंवरसिंह माळवी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शनिवारी पहाटे 4.30 ते 5 वाजेदरम्यान त्यांचे तुळजाई ज्वलेर्स हे दुकान फोडून त्यातील 4 लाख रुपये रोख रक्कम 274 ग्रॅम सोन्याचे दागिने ( किंमत सुमारे 8 लाख 90 हजार 500 रुपये) तसेच 5450 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने (किंमत सुमारे 2 लाख 4 हजार 375 रुपये) असा एकूण 14 लाख 94 हजार 875 रुपयांचा किंमती ऐवज चोरट्यांनी तिजोरीसह चोरून नेला आहे. या दुकानाचे शर्टर वाकवून चार जणांनी ही चोरी केल्याची तक्रार देण्यात आली आहे. ही चोरी 4 जणांनी केली असून चार चाकी वाहनातून चोरलेल्या वस्तू घोऊन चोरटे पसार झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. सिंदखेड पोलीसांनी या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक मल्हार शिवरकर हे अधिक तपास करीत आहेत.

शोभानगरमध्ये राहणारे रोहित लक्ष्मण हंगिरगेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शुक्रवारी रात्री 1 ते 1.30 या वेळेदरम्यान त्यांच्या घराचा कडीकोयंडा अज्ञात चोरट्यांनी तोडला आणि घरात शिरून 5 हजार रुपये रोख रक्कम 3 हजार रुपये किंमतीचे घड्याळ, 2 हजार रुपये किंमतीचे एक घड्याळ असा 10 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. विमानतळ पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक टी.जे. पठाण हे अधिक तपास करीत आहेत.