पावसाळ्याच्या सुरूवातीलाच कास ओव्हरफ्लो, सातारा शहरवासियांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सातारा शहराची तहान भागविणारा कास तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून, सातारकरांवरील पाणीटंचाईचे संकट दूर झाले आहे. कास धरणात 0.75 टीएमसी पाणीसाठा निर्माण झाला आहे. गेल्या आठवडाभरातील दमदार पावसाने अगदी अल्पावधीतच कास तलाव ओव्हरफ्लो झाल्याने सातारकर सुखावले आहेत.

कास धरणातून प्रामुख्याने शहराच्या पश्चिम भागास पाणीपुरवठा केला जातो. मंगळवार पेठ, चिपळूणकर बाग परिसर, यादोगोपाळ पेठ, सोमवार पेठ, शुक्रवार पेठ, शनिवार पेठ, गुरुवार पेठ, भवानी पेठ, प्रतापगंज पेठ, माची पेठेच्या काही भागांना कास धरणातून पाणीपुरवठा होतो. गेल्या महिन्यात कास धरणाची पाणीपातळी 11 फुटांवर होती. मात्र, कास परिसरात गेल्या महिनाभर अवकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसल्यामुळे धरणाच्या पाणीपातळीत झपाटय़ाने वाढ झाली होती. बुधवारपासून कास धरणाच्या पाणलोटक्षेत्रात पावसाची रिपरिप सुरूच होती.

गुरुवारी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने धरण परिसरातील ओढे, नाले भरून वाहू लागले. त्यामुळे कास धरण ओव्हरफ्लो होऊन सांडव्यावरून पाणी वाहू लागले. सध्या कास धरणात 20 फूट पाणीसाठा निर्माण झाला असून, धरणात 0.75 टीएमसी पाणी आहे. धरण भरल्याने उरमोडी नदीपात्रात मोठय़ा प्रमाणावर पाणी आले आहे. त्यामुळे उरमोडी धरण पाणीपातळीतही वाढ होऊ लागली आहे. उरमोडी नदीवरील बंधारेही भरून वाहू लागले आहेत. या ठिकाणी असलेल्या शहापूर पाणीपुरवठा योजनेद्वारे निम्म्या शहरास पाणीपुरवठा केला जातो. पाणी योजनेचे नुकसान होऊन पाणीपुरवठा खंडित होऊ नये यासाठी पाणीपुरवठा विभागाने बंधाऱयावरील लाकडी फळय़ा
काढल्या आहेत.

उंची वाढविण्याचे 90 टक्क्यांहून अधिक काम पूर्ण

सातारा शहरास पाणीपुरवठा करणारे स्रोत दुथडी भरून वाहू लागल्याने सातारकरांचा पाणीप्रश्न संपुष्टात आला असून, शहरवासीयांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे. सातारा शहराची हद्दवाढ झाल्याने मोठा विस्तार झाला आहे. पूर्वीच्या इतकीच लोकसंख्येची भर हद्दवाढीमुळे पडली आहे. भविष्याचा विचार करून कास धरणाची उंची वाढविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर सध्याच्या पाणीपातळीपेक्षा धरणात तिप्पट पाणीसाठा होणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून कास धरणाची उंची वाढविण्याचे काम प्रगतिपथावर असून, ते 90 टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर सातारकरांना मुबलक प्रमाणात पाणी मिळणार आहे.