
सामना प्रतिनिधी। कळवण
तालुक्यातील वनाशी वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या हद्दीत गोसराने गावाच्या शिवारातील उसाच्या शेतात बिबटयांची तीन बछडे आढळल्याने खळबळ उडाली आहे. वनविभागाने या परिसरात पिंजरा लावला असून नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी रात्री अपरात्री बाहेर पडू नये व घाबरू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
गोसराने ता कळवण येथील शेतकरी विश्वास मोरे यांच्या शेतात उसाची तोडणी सुरु आहे. यावेळी ऊसतोड कामगारांना ऊस तोड करताना बिबट्याची तीन बछडे आढळली आहेत. बिबट्याची मादी जवळपासच असल्याच्या कारणाने येथील ऊस तोड बंद करण्यात आली आहे. याबाबत कनाशी वनपरिक्षेत्र कार्यालयाला माहिती देण्यात आली असून वनविभागाने खबरदारीचा उपाय म्हणून बछडे त्याच ठिकाणी ठेवले आहेत. या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला आहे. या घटनेने परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले असून बिबट्याच्या मादीचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.































































