यू टर्न घेणे जीवावर बेतले, भरधाव ट्रकने तिघांना चिरडले; एकाचा मृत्यू

भरधाव ट्रकने एकाच कुटुंबातील तिघांना चिरडल्याची धक्कादायक घटना बिर्ला गेट येथील अजमेरा बिल्डिंग परिसरात घडली. या अपघातात एका मुलाचा मृत्यू झाला असून त्याचे वडील व भाऊ हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उल्हासनगरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कल्याणमध्ये राहणारे किरण चव्हाण हे पीयुष व तनिष या दोन मुलांसोबत दुचाकीने उल्हासनगरला जाण्यासाठी निघाले. शहाड ब्रीज ओलांडल्यानंतर त्यांनी बिर्ला गेटकडे जाण्यासाठी गाडी वळवली. यावेळी मागून आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत तनिष ट्रकच्या चाकाखाली चिरडला गेला, तर किरण व त्यांचा दुसरा मुलगा पीयुषला दुखापत झाली. या घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करत ट्रकचालकाविरोधात गुन्हा नोंदवला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश गीते हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.