सुमार कामगिरीचा ठपका ठेवत प्राध्यापकांचे होर्डींग लावले, कल्याणमधील घटनेने खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रत्येक महाविद्यालयात वर्गात अनुपस्थित असणाऱ्या आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष्य करणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी लावण्यात येते. ती ब्लॅक लिस्ट म्हणून ओळखली जाते. मात्र, कल्याणच्या के. एम. अग्रवाल महाविद्यालयाने गेल्या सोमवारी मुख्य प्रवेशद्वारावर जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत कमी व्याख्याने घेणाऱ्या आणि कार्यतत्पर नसणाऱ्या ‘नॉन परफॉर्मिंग’ सहा प्राध्यापकांच्या नावाचा उल्लेख असणारे फलक लावले होते. हे फलक प्रवेद्वाराजवळच लावण्यात आले होते. त्यामुळे काही वेळातच हे पोस्टर सोशल मिडीयार व्हायरल झाले आणि खळबळ उडाली.

व्हायरल झालेल्या या पोस्टरबाबत प्राध्यापकांनी व्यवस्थापनाच्या निर्णयाविरोधात नाराजी जाहीर केली आहे. हा प्राध्यापकांचा अपमान असल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेनंतर झालेल्या गोंधळामुळे दुसऱ्याच दिवशी महाविद्यालयाने पोस्टर मागे घेतले आहे. कमी व्याख्याने घेणाऱ्या आणि कार्यतत्पर नसणाऱ्या इतर काही प्राध्यापकांचा नावांचा या यादीत उल्लेख नाही. त्यामुळे ठराविक प्राध्यापकांना लक्ष्य करण्याचा व्यवस्थापनाचा छुपा अजेंडा असल्याचा आरोप यादीत नाव असलेल्या प्राध्यापकांनी केला आहे. मात्र, भविष्यात अशा त्रुटी टाळण्यासाठी आणि प्राध्यापकांच्या कामगिरीमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने पोस्टर लावल्याचा दावा व्यवस्थापनाने केला आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कॉलेजने विद्यार्थ्यांचे नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पोस्टर लावले होते आणि शुभेच्छांसोबत नॉन परफॉर्मिंग प्राध्यापकांच्या नावाचाही उल्लेख होता. पोस्टरमध्ये लिहिले आहे की, “आमची नॉन-परफॉर्मिंग अॅसेट्स ज्यांनी सर्वात कमी लेक्चर्स आयोजित केल्या आहेत”. त्याखाली कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील प्रत्येकी दोन प्राध्यापकांची नावे होती. या पोस्टरमुळे आश्चर्यचकित झालेल्या विद्यार्थ्यांनी पोस्टरचे फोटो काढले आणि काही वेळातच ते व्हायरल झाले. काही विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले. ते म्हणाले की यामुळे विद्यार्थ्यांना मदत होईल आणि प्राध्यापक त्यांचे काम अधिक गांभीर्याने करतील.

एका विद्यार्थ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की, ” कमी व्याख्याने घेणाऱ्या आणि कार्यतत्पर नसलेल्या प्राध्यापकांचे असे पोस्टर आम्ही पहिल्यांदाच पाहिले आणि मला वाटते की महाविद्यालयाने हे चांगले काम केले आहे. मुंबई विद्यापीठात किंवा कॉलेजच्या परिपत्रकात अशी नावे जाहीर करण्याचा कोणताही नियम नाही, असे प्राध्यापकांनी सांगितले. कॉलेज व्यवस्थापनातील काही लोकांनी जाणूनबुजून काही प्राध्यापकांना लक्ष्य केले आहे. इतरही कमी व्याख्याने घेणारे आणि कार्यतत्पर नसलेले प्राध्यापक आहेत. मात्र, त्यांचा यादीत उल्लेख नसल्याचा दावा प्राध्यापकांनी केला आहे.

दुसर्‍या एका प्राध्यापकांनी सांगितले की, सहा प्राध्यापकांपैकी दोन वैद्यकीय रजेवर होते. तरीही व्यवस्थापनाने त्यांना अशा प्रकारे लक्ष्य केले आहे. के.एम. अग्रवाल कॉलेज व्यवस्थापनाचे सचिव ओमप्रकाश (मुन्ना) पांडे यांनी सांगितले की, “दरवर्षी, आमच्या कॉलेजची उत्तीर्णतेची टक्केवारी 98% ते 99% आहे. विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या उद्देशाने पोस्टर लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांत या प्राध्यापकांच्या कमी व्याख्याने घेण्यामुळे आणि कामात दुर्लक्ष्य केल्यामुळे विद्यार्थ्यांना संबंधित विषयात अडचणी येत होत्या. पोस्टर लावण्याआधी आम्ही या प्राध्यापकांना इशारा दिला होता. मात्र, त्यांनी तो गांभीर्याने घेतला नसल्याने आम्ही यादी जाहीर केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, यादी व्हायरल झाल्यानंतर झालेल्या गोंधळामुळे दुसऱ्याच दिवशी कॉलेजने पोस्टर हटवले आहेत.