मी मेहनतीने स्टार झाले, बापाच्या नावावर नाही! कंगनाने ‘या’ अभिनेत्रीला सुनावलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
kangana-ranaut-slams-sonam

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलीवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेता नाना पाटेकरांवर लैंगिक अत्याचाराचा आरोप केल्यानंतर अभिनेत्री कंगनाने ‘क्विन’चा दिग्दर्शक विकास बहलवर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला. हळूहळू आणखी काही अभिनेत्री पुढे येण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. मात्र यामुळे बॉलीवूडमध्ये दोन गट पडल्याचं समोर येत आहे. आपण केलेल्या आरोपांवर अभिनेत्री सोनम कपूरनं जाहीर अविश्वास दाखवल्यानं कंगना चांगलीच संतापली आणि तिनं सोनमला ‘मी मेहनतीने स्टार झाले, बापाच्या नावावर नाही’, अशा शब्दांत सुनावलं.

sonam-kapoor

शनिवारी फँटम फिल्म्समध्ये काम केलेल्या एका महिला कर्मचारीने विकास बहल याच्यावर विनयभंगाचा आरोप केला होता. विकास बहल याने ‘बॉम्बे वेल्वेट’ चित्रपटाच्या वेळी आपल्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप त्या महिलेने केला. त्या महिलेच्या आरोपांनंतर कंगना राणौतने तिला साथ देत विकास बहल याने ‘क्वीन’ चित्रपटाच्यावेळी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला. ‘बहल याचे लग्न झालेले असतानाही तो नेहमी वेगवेगळ्या पार्टनरसोबत सेक्ससाठी चर्चा करायचा. आम्ही कधीही भेटलो की तो मला घट्ट मिठी मारायचा’, असे आरोप तिने केले.

यावर सोनम कपूराला एका इव्हेंटमध्ये प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तिने ‘प्रत्येकवेळी कंगनावर विश्वास ठेवणं योग्य नाही’, असं उत्तर दिलं होतं.

सोनमचं हे उत्तर कंगनाला झोंबलं. तिने तात्काळ प्रत्युत्तर दिलं. ‘मला जज्ज (चूक-बरोबर) करण्याचा अधिकार सोनमला कुणी दिला? कोणत्या महिलेवर विश्वास ठेवावा, कुणावर नाही, याचा परवाना सोनमकडे आहे का? माझ्या आरोपांवर ती कसे प्रश्न उपस्थित करू शकते. मी अनेक आंतरराष्ट्रीय मंचावर देशाचं प्रतिनिधित्व केलं आहे. मी आपल्या वडिलांच्या नावामुळे या इंडस्ट्रीत ओळखली जात नाही, मेहनत करून स्वत: जागा निर्माण केली आहे. सोनम चांगली अभिनेत्री म्हणून ओळखली जात नाही किंवा चांगली वक्ता देखील नाही. या फिल्मी लोकांना माझी चेष्टा करण्याचा अधिकार देतं कोण’, असा सणसणीत प्रतिहल्ला तिनं चढवला आहे.

आता कंगनाच्या उत्तरानं कपूर परिवारालाच या वादात ओढलं आहे. त्यामुळे हा वाद आणखी चिघळणार अशी शक्यता आहे.