
महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कराड तालुक्यातील पाल येथील 25 जानेवारीला होणारी श्री खंडोबा देवाची यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. श्री खंडोबा देवाच्या यात्रेतील धार्मिक विधी, पूजाअर्चा, रुढी परंपरेनुसार करण्यात येईल. मात्र, जिल्हाधिकाऱयांच्या निर्देशानुसारच यावर्षी यात्रा पार पडेल, अशी माहिती प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी दिली.
पाल खंडोबा यात्रेच्या अनुषंगाने आयोजिलेल्या नियोजन बैठकीत ते बोलत होते. देवस्थानचे प्रमुख मानकरी देवराज पाटील बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. अतिरिक्त पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील, अतिरिक्त तहसीलदार जनार्दन कासार, आपत्ती व्यवस्थापनाचे देवीदास ताम्हाणे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन पाटील, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, उंब्रज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड आदी उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची सुरक्षितता महत्त्वाची असून, यात्रा कालावधीत 10 ते 15 जानेवारीपासून सतर्क राहायचे आहे. या कालावधीत कोणतेही स्टॉल, गाडी लावू द्यायचे नाहीत, याची सर्वस्वी जबाबदारी यात्रा समितीची राहणार आहे. पाल येथे भाविक येऊ नयेत, यासाठी सुमारे आठ ते दहा किलोमीटरच्या सर्कलमधील परिसर सील करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी दिघे यांनी सांगितले. तथापि, या निर्णयावर जिल्हाधिकारी पुढील आढावा बैठकीत निर्णय देतील, अशी माहिती प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी दिली.
पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील यांनी गर्दी टाळण्यासह श्री खंडोबा देवाचे भाविकांना ऑनलाइन दर्शन व्हावे, यादृष्टीने इंदोली फाटा, काशीळ येथे यात्रा समितीने मोठी क्रीन बसवून ऑनलाइन दर्शनाची सोय करावी, अशी सूचना केली.
बैठकीस संजय काळभोर, बाबासाहेब शेळके, मंगेश कुंभार, संजय गोरे, सचिन लवंदे, यात्रा समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. देवराज पाटील यांनी प्रास्ताविक केले. सह्याद्रीचे संचालक सर्जेराव खंडाईत यांनी आभार मानले.
लग्नसोहळ्याच्या मिरवणुकीला परवानगी देण्याची मागणी
पाल यात्रेचा मुख्य सोहळा खंडोबा-म्हाळसा यांचा विवाह हा असून, खंडोबा देवाच्या लग्न सोहळ्यासाठी येणारी वऱहाडी व मानकरी मंडळी व ट्रक्टरमधून लग्न सोहळ्यासाठी निघणारी मिरवणूक मोजक्या मानकऱयांच्या उपस्थितीत काढण्यासाठी प्रशासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी देवराज पाटील यांनी केली.


























































