ऐन दुष्काळात कर्नाटकने महाराष्ट्राचे पाणी पळवले, कन्नडिगांची दंडेली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, वलांडी

पाऊसच पडला नसल्याने संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळाचा भयंकर वणवा पेटला आहे. नदीनाले आटले असून धरणांनी तळ गाठला आहे. भीषण परिस्थिती असतानाही कर्नाटकने सिंधीकामठ बंधाऱ्याचे गेट उघडून महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी पळवल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. मांजरसुंब्याच्या डोंगररांगांमध्ये उगम पावणाऱ्या मांजरा नदीवर देवणी तालुक्यात सिंधीकामठ येथे पंधरा वर्षांपूर्वी कोल्हापुरी बंधारा बांधण्यात आला. या बंधाऱ्यासाठी महाराष्ट्र व कर्नाटकने समान खर्च केला आहे. दोन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागातील जनतेने समसमान पद्धतीने बंधाऱ्यातील पाण्याचा वापर करावा या करारावर हा बंधारा बांधण्यात आला.

उभय राज्यांत झालेल्या कराराला मूठमाती देत कर्नाटकातील भालकी येथील कानडी अधिकाऱयांनी आज मोठा पोलीस बंदोबस्त आणून सिंधीकामठ येथील कोल्हापुरी बंधाऱ्याचे दरवाजे दमदाटी करून जेसीबीच्या मदतीने उघडले. कानडी अधिकाऱ्यांना विजयनगर येथील शेतकऱ्यांनी विरोध केला, परंतु या विरोधाला न जुमानता कानडी अधिकाऱ्यांनी पाणी पळवले. एका तरुणाने पाण्यात उडी घेऊन विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण त्यालाही बाहेर हाकलून देण्यात आले.

महाराष्ट्राचे प्रशासन गप्प
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या तोंडचा घास कानडी अधिकारी पळवत असताना देवणीचे तहसीलदार, महाराष्ट्र पोलीस गप्प उभे राहून पाहत होते. समान पाणीवाटपाचा करार असून तेवढेच पाणी घ्यावे असे सांगण्याचे धाडसही या अधिकाऱ्यांनी दाखवले नाही. या अधिकाऱ्यांच्या ढिम्मपणामुळे शेतकऱयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. कर्नाटकने आपल्या शेतकऱयांच्या सोयीसाठी माणकेश्वर, तुगाव, ईचूर, जिरग्याळ येथे मांजरा नदीवर बंधारे बांधले आहेत. या बंधाऱ्यांमध्ये पाणी असतानाही केवळ आकसापोटी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी कर्नाटकने पळवले असा आरोप या भागातील शेतकऱ्यांनी केला आहे.