
कर्नाटक हातचे जात असल्याचे पाहून बिथरलेल्या भाजपच्या प्रचाराचा स्तर अत्यंत खाली घसरला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस पुन्हा सत्तेत आल्यास दंगली होतील असे बिनबुडाचे विधान केल्यानंतर आता भाजपच्या एका आमदाराने काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी विषकन्या असून त्या चीन, पाकिस्तानच्या एजंट असल्याचे म्हटले आहे.
कर्नाटक विधानसभेचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. अनेक सर्व्हेक्षणातून कर्नाटक भाजपच्या हातून निसटत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भाजपचे नेते बिथरले आहेत. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रचारात काँग्रेसवर खालच्या भाषेत टीका केली होती. त्यानंतर अमित शहा यांनी तर काँग्रेस सत्तेत आल्यास दंगली होतील असे सांगून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आता भाजपचे आमदार बासनगौडा पाटील यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी या विषकन्या असल्याचे गरळ ओकले आहे. सोनिया या चीन, पाकिस्तानच्या एजंट असल्याचा आरोपही त्यांनी केला.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी गदग जिल्हय़ात एका जाहीर सभेत बोलताना मोदी हे विषारी सापासारखे असून त्याचे विष चाखण्याचा प्रयत्न करू नका असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून वादंग उठल्यानंतर खरगे यांनी दिलगिरी व्यक्त करून आपण कुणावरही वैयक्तिक टीका केली नाही, आपला रोख भाजपकडे होता असा खुलासा केला.






























































