
कर्नाटक येथील बीदर जिल्ह्यात दसऱ्या दिवशी 550 वर्षांपूर्वीच्या जुन्या मदरशात घुसखोरी करून पूजा करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जणांना अटक करण्यात आली आहे.
हा बीदर येथील मेहमूद गवाचा प्राचीन मदरसा असून तो भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या सूचित संरक्षित स्मारक म्हणून याची नोंद करण्यात आली आहे. दसऱ्याच्या रात्री दोन वाजता मदरशाभोवती गर्दी जमा झाली. त्यांनी आधी मदरशाचं कुलूप तोडलं आणि त्यात कुंकवाचा सडा घालण्यात आला. त्यानंतर पूजा करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. यात काही जण मदरशाच्या जिन्यावर उभं राहून जय श्रीराम आणि हिंदू धर्म की जय अशा घोषणा देत आहेत, असा उल्लेख लाईव्ह हिंदुस्तान या वेबसाईटने दिलेल्या वृत्तात करण्यात आला आहे. या व्हिडीओची अधिकृतता तपासण्यात आली नसल्याचंही वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. त्याखेरीज पाच जणांचा शोध सुरू आहे. दरम्यान, एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी या प्रकरणी ट्वीट करून भाजपवर टीका केली आहे. राज्यातील भाजप सरकार मुस्लिमांचा अपमान करण्यासाठी अशा घटनांना प्रोत्साहन देत आहे, असं ओवैसी यांनी म्हटलं आहे. ऐतिहासिक मेहमूद गवा मशिदीत काहींनी गेटचं कुलूप तोडून मदरशाला अपवित्र करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलीस असं कसं होऊ देऊ शकतात, असंही त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.




























































