
मामाच्या गावी आलेल्या आठ वर्षीय चिमुकल्याचा बळी घेणारा बिबट्या अखेर जेरबंद झाला आहे. गेले २२ दिवस या बिबट्याने कसाऱ्यातील डोळखांब परिसरात दशहत निर्माण केली होती. त्याला पकडण्यासाठी वनविभागाने विविध ठिकाणी पिंजरे लावून गस्तही वाढवली होती. मात्र अखेर हा बिबट्या कळभोंडा गावाच्या परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात अडकला आणि वनविभागाचे ऑपरेशन यशस्वी झाले. बिबट्या पकडला गेल्यामुळे डोळखांब परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
लाद्याची वाडी येथील कृष्णा आगिवाले (८) या चिमुकल्याचा बळी घेणारा बिबट्या गेल्या २२ दिवसांत डोळखांब परिसरातील अनेक गावांमध्ये ग्रामस्थांना दिसला होता. त्यामुळे लहान मुले, महिला आणि शेतकरी वर्गामध्ये मोठी दहशत पसरली होती. कृष्णाचा बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेल्यानंतर ग्रामस्थांनी वनविभागाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली होती.
विविध सामाजिक संघटनांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता. नागरिकांच्या वाढत्या दबावानंतर वनविभागाने विशेष पथके तयार करून परिसरात पिंजरे, ट्रॅप कॅमेरे आणि रात्री गस्त वाढवली होती. तरीही बिबट्या वनविभागाच्या हाती लागत नव्हता. मात्र कळभोंडा गावाच्या परिसरात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात हा बिबट्या अखेर अडकला. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
– बिबट्या जेरबंद झाला असला तरी, या परिसरात लावलेले ट्रॅप कॅमेरे अजून काही दिवस कायम ठेवावेत, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.
– बिबट्याला पकडण्यात यश आले असले तरी आपल्या परिसरातील बिबट्याची संख्या पाहता ग्रामस्थांनी एकटे फिरणे टाळावे, असे आवाहन शहापूरचे वनाधिकारी दीपेश
कृष्णाच्या कुटुंबातील सदस्याला सरकारी नोकरी द्या !
नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात २२ दिवसांपूर्वी कृष्णा आगिवाले या आठ वर्षीय मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे. आई नारायणगाव येथे कामाला गेल्यावर तो व त्याची भावंडे मामाकडे राहात होती. शाळांना सुट्टी असल्यामुळे कृष्णा रानमेवा आणण्यासाठी जंगलात गेला असता अचानक बिबट्याने त्याच्यावर हल्ला करत त्याला ठार मारले होते. या दुर्दैवी घटनेनंतर शासनाने मदत जरी दिली असली तरी ती तुटपुंजी आहे. त्यामुळे कृष्णाच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय सेवेत घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.




























































