
सामना प्रतिनिधी । कसारा
अपघातात गंभीर जखमी झालेल्या चालकाला कंटेनरमधून बाहेर काढत असतानाच मागून भरधाव आलेल्या कंटेनरने कलंडलेल्या दुसऱ्या कंटेनरला जोरदार धडक दिल्याची घटना गुरुवारी कसारा घाटाजवळ घडली. मात्र प्रसंगावधान राखत एका क्षणात जिवाच्या आकांताने बाजूला धाव घेतल्याने कसारा पोलिसांसह आपत्ती व्यवस्थापन टीमचे प्राण वाचले. केवळ एका सेकंदाच्या फरकाने घडलेल्या या भीषण अपघाताने सर्वांचा थरकाप उडाला. काळ आला होता, पण वेळ नाही, असेच शब्द यावेळी सर्वांच्या तोंडून निघाले.
मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा फाटय़ानजीक आज दुपारी एकच्या सुमारास नाशिकहून भरधाव आलेला कंटेनर एका वळणावर कलंडला होता. या अपघाताची माहिती समजताच कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी भोये, पोलीस कर्मचारी इखनकर, बिडवाल, कोथे, चौधरी, तिडके तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र जखमी चालकाला कंटेनरमधून बाहेर काढत असताना मागून आलेला भरधाव कंटेनर उलटलेल्या या कंटेनरवर येऊन जोरदार आदळला. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता जखमी चालकासह बाजूला धाव घेतली. त्यामुळे केवळ एका सेकंदाने सर्वांचे प्राण वाचले, अन्यथा कसारा घाटात आज या भीषण अपघातात रक्तामांसाचा चिखलच झाला असता.
साक्षात मृत्यूच आमच्या दिशेने धाव घेत होता!
भरधाव आलेला कंटेनर पाहून एका क्षणी साक्षात मृत्यूच आमच्या दिशेने धाव घेतो की काय, असा भास झाला, पण सुदैवाने वेळ न आल्याने आम्ही काळाला हुलकावणी दिली. देवाचे आम्ही आभारच मानतो, अशी भावना आपत्ती व्यवस्थापन टीममधील राजेश मोरे, जितू आहेर, विजय वाटेकर यांनी व्यक्त केली.





















































