
राज्यात काँग्रेसमध्ये गृहकलह उफाळून आला आहे. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा तडकाफडकी राजीनामा देत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरुद्ध दंड थोपटले आहेत. त्याचवेळी कसबा पोटनिवडणुकीतही काँग्रेसला बंडखोरीचे ग्रहण लागले असतानाच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या एका पह्नने मनोमिलनाची नांदी घडवली आहे. कसब्यातील बंडखोर बाळासाहेब दाभेकर यांनी तलवार म्यान करत आपला उमेदवारी अर्ज आज मागे घेतला आहे. दुसरीकडे बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांच्यात ’पॅचअप’ घडवण्यासाठी हायकमांडच्या आदेशाने हालचाली सुरू झाल्या आहेत.
काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील हे 12 फेब्रुवारी रोजी मुंबईत येणार आहेत. यावेळी राज्यातील प्रमुख काँग्रेस नेत्यांशी ते चर्चा करणार आहेत. ते नाराज नेते बाळासाहेब थोरात यांचीही भेट घेतील, असे सांगण्यात आले.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज दिल्लीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. काँग्रेसमधील धुसफूस लक्षात घेता ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. ही सदिच्छा भेट होती, असे सांगताना त्यांनी थोरात यांच्याबाबत महत्त्वाचे विधान केले.
थोरातांच्या राजीनाम्याचे काय होणार?
बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा मंजूर झाला आहे का?, असे विचारले असता थोरात यांचा राजीनामा स्वीकारायचा की नाही, याचा निर्णय हायकमांड घेईल, अशी प्रतिक्रिया वडेट्टीवार यांनी दिली. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णयही हायकमांडच्या हाती असल्याचे सूचक विधान वडेट्टीवार यांनी केले.
ठिणगी नेमकी कशी पडली?
विधान परिषदेच्या निवडणुकीत बंडखोरीचे कारण देत डॉ. सुधीर तांबे आणि सत्यजीत तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. सत्यजीत तांबे अपक्ष लढले आणि जिंकले. या साया घटनाक्रमामुळे बाळासाहेब थोरात दुखावले असल्याचे बोलले जात आहे. थोरात हे तांबे यांचे सख्खे मामा आहेत.
संघटनात्मक बदल होणार – पृथ्वीराज चव्हाण
रायपूरमध्ये 24 ते 26 फेब्रुवारी दरम्यान काँग्रेसचे महाअधिवेशन होत असून या अधिवेशनानंतर काही संघटनात्मक बदल होतील, असे महत्त्वाचे विधान काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. पटोले आणि थोरात यांच्यातील वाद मोठा नाही. काँग्रेसमध्ये एक प्रक्रिया आहे त्यानुसार हा वाद मिटवला जाईल केवळ जाहीर विधाने टाळली पाहिजेत, असेही चव्हाण म्हणाले.
पुण्यातील कसब्यातून काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली असून नाराज बाळासाहेब दाभेकर यांनी बंड पुकारत अपक्ष अर्ज भरला होता. राज्यातील नेत्यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, पण ते ठाम राहिले. त्यामुळे काँग्रेसपुढे पेच निर्माण झाला होता.
राहुल गांधी यांचा पह्न येताच बाळासाहेब दाभेकर यांनी बंडाची तलवार म्यान केली असून आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. खुद्द दाभेकर यांनीच याबाबत माहिती दिली. 40 वर्षे काम करूनही उमेदवारी देताना डावलले म्हणून मी नाराज होतो, पण राहुल गांधी यांच्या पह्नने माझे मन बदलले. एका सामान्य कार्यकर्त्याला राहुल गांधी स्वतः पह्न करत असतील तर ती माझ्यासाठी गर्वाची बाब आहे. म्हणूनच मी त्यांना आश्वस्त करून अर्ज मागे घेतला, असे दाभेकर यांनी सांगितले. दाभेकर यांना बुधवारी रात्री राहुल गांधी यांचा पह्न आला होता.
पटोले विरुद्ध थोरात वाद शमणार?
बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरुद्ध दंड थोपटत थेट विधिमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. हायकमांडला पाठवलेल्या पत्रात पटोले यांच्यासोबत काम करणे कठीण होऊन बसल्याचे थोरात यांनी नमूद केले आहे. त्यामुळे काँग्रेसमधील गृहकलह चव्हाटय़ावर आला असून ‘डॅमेज पंट्रोल’साठी आता दिल्लीतूनच हालचाली सुरू झाल्याचे कळते. यात राहुल गांधी यांनी विशेष लक्ष घातले असून दोन्ही नेत्यांत ‘पॅचअप’ घडवण्याची जबाबदारी महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्याकडे देण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.































































