
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शाळा आणि कॉलेजला सुट्ट्या असल्याने या काळात अनेकजण आपल्या कुटुंबीयांसोबत थंड हवेच्या ठिकाणी जाणं किंवा अलिकडे पूल पार्टी किंवा रिसोर्टवर गेट टुगेदर असे प्लान आखतात. मात्र ही मजा केवळ ३-४ दिवसांची असते. त्यानंतर भला मोठा उन्हाळा समोर उभा ठाकलेला असतो. एसी किंवा पंखे लावून घरातच बसावं आणि कुठेच बाहेर पडू नये असं अनेकांना वाटतं. उन्हाळ्यात घरात बसून एसीची हवा खात असताना मात्र अनेकांना वाढत्या वीज बिलाची चिंता देखील असते. घर गारही ठेवायचं आहे आणि वीजबीलाची चिंता अशी परिस्थिती असते. उन्हाळ्याच्या तीन महिन्यांमध्ये वीजेचा मोठा वापर तर होतोच मात्र एसी आणि कुलरच्या अति वापरामुळे याचा ग्लोबल वार्मिंगवरही परिणाम होत असतो. यासाठीच काही अशा टिप्स ज्या उन्हाळ्यात तुम्हाला आणि तुमच्या घराला गार ठेवण्यास मदत करतील तेही कमी वीजेचा वापर करून. यामुळे वीज बील तर कमी येईलच शिवाय निसर्गाला देखील हानी पोहचणार नाही.
घराच्या खिडक्या बंद ठेवा –
दुपारच्या वेळेतही तुम्हाला जर घर थंड ठेवायचं असेल तर घराच्या सर्व खिडक्या आणि काचा बंद करा. खास करून ज्या दिशेन घरात ऊन येत असेल तिथल्या खिडक्या बंद ठेवा . कडक उन्हाळ्यात घर गार ठेवण्यासाठी ब्लॅक-आउट पडद्यांमध्ये थोडी गुंतवणूक करा. यामुळे तुम्हाला मोठे फायदे होतील. हे पदडे जाड असल्याने यातून सुर्यप्रकाश घरात शिरत नाही. त्यामुळे घर गार राहण्यास मदत होते.
घराच्या भिंती किंवा काचा गार ठेवा –
घराच्या भिंती थंड राहिल्या तर आपसूकच घर गार राहण्यासाठी पंखा किंवा एसीचा कमी वापर करावा लागेल. यासाठीच भिंत बाहेरून झाकली जाईल असे प्रयत्न करा. तुम्ही घराच्या बाहेरील बाजूने काही रोपांच्या कुंड्या ठेवू शकता. तसचं खिडक्या किंवा स्लायडिंग विंडो असेलेल्या बालकनीत थोड्या मोठ्या कुंडया असलेली रोपं ठेवा. बैठ घर असलेल्यांसाठी घराभोवती मोठी झाडं लावणं हा घर गार ठेवण्यासाठीचा एक उत्तम पर्याय आहे.
एसीचा वापर कसा कराल –
उन्हाळ्यात जर तुम्हाला एसी वापरायचाच असेल तर थर्मोस्टॅट २४ ते २७ सेल्सियम दरम्यान ठेवा. घर गार राहण्यासाठी ते २० हून कमी ठेवू नका. जर तुम्ही नवा एअर कंडीशनर घेण्याचा विचार करत असाल तर ५ स्टार रेटिंग असलेल्या एसीमध्ये गुंतवणूक करा. ५ स्टार रेटिंग असलेली उपकरणं कमी वीज खेचतात. त्यामुळे वीज बील कमी येण्यास मदत होते.
दारे खिडक्या बंद ठेवा –
ज्या खोल्यांमध्ये तुम्हाला ये-जा करायची नाही किंवा तुम्ही वापरत नाहीत त्या खोल्यांची दारं बंद ठेवा. तसचं खिडक्या आणि दारांमध्ये फट राहणार नाही याची काळजी घ्या. दिवसभर खिडक्या दार बंद ठेवल्यानंतर संध्याकाळी मात्र खिडक्या आवर्जुन उघडा. सुर्य खाली गेल्यानंतर वातावरण सामान्य झाल्यानंतर घरात बाहेरील थंड हवा आल्याने घर गार होईल. जर तुम्हाला घर गार ठेवण्यात अडचण येत असले तर त्यासाठी तुमच्या घरातील लाईटचे बल्ब देखील त्यासाठी जबाबदार ठरू शकतात. काही घराममध्ये अजूनही जुने पूर्वीच बल्ब वापरले जातात. त्याएवजी नवे LED एनर्जी सेव्हिंग ब्लब वापरा यामुळे देखील घर गार राहण्यास मदत होईल. याशिवाय बाजारात वाळ्याचे पडदे उपलब्ध असतात. हे पडदे तुम्ही दारं खिडक्यांना लावू शकता. या पडद्यांवर पाणी शिंपडून ठेवल्यास घरात चांगला गारवा राहतो.
घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणं जरूर नसताना बंद ठेवा –
इलेक्ट्रॉनिक उपकरणं जास्त वेळ सुरु राहिल्याने ती तापतात आणि वातावरण गरम होतं. यासाठी आवश्यकता नसल्यास ही उपकरणं बंद ठेवण्याचा प्रयत्न करा. याचसोबत घरात सतत स्वयंपाक गरात स्वयंपाक सुरू राहिल्यास खूप उष्णता निर्माण होते. शक्य असल्यास किचनमध्ये एक्झॉस्ट फॅन लावा. जर तुमच्याकडे एक्झॉस्ट फॅन नसेल तर शक्य झाल्यास सकाळी ११ पूर्वी सर्व स्वयंपाक उरका. यामुळे किचमधून बाहेर येणाऱ्या गरम वाफेमुळे होणारी उष्णता टाळता येईल.
ही ५ रोपं तुमचं घर करतील Cool
इनडोअर प्लांट्स म्हणजेच घराच्या आत लावण्यात येणारी रोपं हा घर गार ठेवण्यासाठीचा एक उत्तम पर्याय आहे. अनेकजणांच्या घरात इनडोअर प्लांट्स असतील पण फार फार एक किंवा दोन. मात्र उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेचा विचार करता तुम्ही काही रोपं लावणं गरजेचं आहे ज्यामुळे घर तर गार राहीलच शिवाय घरातील हवा शुद्ध होईल. इनडोअर प्लांट्स मुळे तुमच्या घराची शोभा देखील वाढेल.
1) कोरफड – त्वचा थंड ठेवण्यासाठी आणि सनबर्न पासून त्वचेचं रक्षण करण्यासाठी कोरफड मदत करते. मात्र, त्यासोबतच तुमचं घर गार ठेवण्यासाठी देखील कोरफड उपयोगात येऊ शकते. कोरफडीचे रोप घरात लावल्यास तुमचं घर गार राहण्यास मदत होईल. त्याचसोबत घरातील अशुद्ध हवा बाहेर टाकण्यास मदत होईल. त्यामुळे तुम्ही घराच्या कोणत्याही कोपऱ्यात जिथे दिवसा काहीशा प्रमाणात सूर्यप्रकाश येत असेल अशा ठिकाणी हे कोरफडीचे रोप लावू शकता.
2) अरेका पाम ट्री – लिविंग रूमसाठी लोकप्रिय असलेल्या काही रोपांपैकी एक म्हणजे अरेका पाम ट्री. हे डेकोरेटिव इनडोअर प्लांट घरातील हवेत नैसर्गिकरित्या गारवा निर्माण करण्याचं काम करतं. घरात गारवा निर्माण करण्यासोबतच ते हवेतील अनेक टॉक्सिन्स जसं की बेन्जाइन, फॉर्मलडेहाइड यांना घराबाहेर काढण्यास मदत करतं आणि हवा शुद्ध ठेवतं.
3. फिकस ट्री – फिकस ट्री या रोपाला विपिंग फिग असंही म्हटलं जातं. या रोपामुळे घराच्या आतील हवेचं तापमान कमी होण्यास मदत होईल. हे रोपदेखील हवा शुद्ध करण्यास मदत करतं. जेवणाच्या टेबलावर हे रोप तुम्ही ठेवू शकता.
4. फर्न प्लांट- घर नैसर्गिकरित्या गार होण्यासाठी तुम्ही फर्न प्लांट हे देखील घरात लावू शकता. घरातील तापमान कमी करून हवेत गारवा राखण्याचं काम हे रोप करतं. त्यासोबतच हवा शुद्ध करणाऱ्या रोपांपैकी हे एक महत्त्वाचं रोप मानलं जातं. घराच्या आत खिडकी जवळ किंवा सोफ्या समोरील टेबलावर देखील तुम्ही हे रोप ठेवू शकता.
5. स्नेक प्लांट- इनडोअर प्लांटमध्ये लोकप्रिय असलेलं आणखी एक रोप म्हणजेच स्नेक प्लांट. हे झाड रात्रीच्या वेळी ऑक्सिजन बाहेर सोडत असल्यामुळे घराच्या आतील वातावरण थंड राहण्यास मदत होते. हवेतील विषारी पदार्थ बाहेर फेकण्यास मदत करतात त्यामुळे घरातील हवा शुद्ध राहते. या रोपाचे विविध प्रकार येतात जे घरात लावून तुम्ही घराची शोभा वाढवू शकता. घरात लावण्यात येणाऱ्या या रोपांना जास्त सूर्यप्रकाशाची आवश्यकता नसते. तसंच पाणीदेखील कमी लागतं. गरम वातावरणातही ते सहज जगतात. त्यामुळे ही रोप लावून घराची शोभा वाढवण्यासोबतच घरात गारवा राखण्यास आणि हवा शुद्ध होण्यास मदत होऊ शकते




























































