दक्षिण आशियाई खो-खो स्पर्धेत हिंदुस्थानची विजयी सलामी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तेरावी दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा काठमांडू-पोखरा, नेपाळ येथे 10 डिसेंबरपर्यंत खेळवली जात आहे. सदर स्पर्धेतील   खो-खो सामने  काठमांडू येथे सुरू आहेत. 2015-16  मध्ये  झालेल्या दक्षिण आशियाई स्पर्धेत हिंदुस्थानने खोखोचे  सुवर्ण पदक मिळवले होते.

रविवारी काठमांडू येथे झालेल्या पुरुषांच्या सामन्यात बाळासाहेब पोकार्डेच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानी संघाने श्रीलंकेचा 21-8  असा एक डाव  13  गुणांनी धुव्वा उडवला. या सामन्यात हिंदुस्थानच्या अक्षय गणपुलेने तीन मिनिटे दहा सेकंद संरक्षण केले. सुदर्शनने दोन मिनिटे संरक्षण केले व तपन पॉलने दोन मिनिटे वीस सेकंद संरक्षण करताना एक गडी बाद केला. तर कर्णधार बाळासाहेब पोकार्डेने दोन मिनिटे संरक्षण केले. सागर पोद्दारने दोन मिनिटे संरक्षण करताना तीन गडी बाद केले व आक्रमणात सत्यजित सिंगने 5 गडी बाद केले तर अभिनंदन पाटील व श्रेयस राऊळने प्रत्येकी तीन 3-3 गडी बाद केले व विजयात मोलाचा वाटा उचलला, तर पराभूत श्रीलंकेच्या चंद्रसिरी, व थिगारामल यांनीच थोडाफार लढत दिली.