
>> प्रणय पाटील
पुरातत्व विभागाच्या भोंगळ कारभारामुळे रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक अमूल्य ठेवा नष्ट होत चालला आहे. गडकिल्ल्यांची दुरवस्था झाली असून ते अखेरच्या घटका मोजत आहेत. अलिबागमधील थळ येथील अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेला खुबलढा किल्लाही पुरातत्व खात्याच्या मोगलाई कारभारामुळे धारातीर्थी पडला आहे. शिवरायांच्या आरमारातील या जलदुर्गाच्या तटबंदीचे आता फक्त अवशेष शिल्लक आहेत. त्यामुळे पूर्वी येथे एक किल्ला होता असे म्हणण्याची वेळ आली आहे.
सागरी आक्रमणाला तोंड देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी बुलंद असे आरमार उभारले. बंदुकांच्या फैरी, तोफांचा मारा झेलीत या जलदुर्गांनी सागरी सीमांचे संरक्षण केले. आज मात्र अनेक जलदुर्ग नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्याची जबाबदारी पुरातत्व विभागाची आहे. अशा वास्तू पुरातत्व विभागामार्फत संरक्षित वास्त म्हणन घोषित करण्यात येतात. मात्र खबलढा किल्ल्याकडे पुरातत्व विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. हा किल्ला पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर असूनही अद्याप किल्ल्याची वास्तू संरक्षित वास्तू म्हणून घोषित करण्यात आलेली नाही. सद्यस्थितीत हा किल्ला मासळी सुकविण्याचे केंद्र बनला आहे. या किल्ल्याची तातडीने डागडुजी करून जाज्वल्य इतिहासाच्या पाऊलखुणा जिवंत ठेवण्याची गरज आहे.
खुबलढा किल्ल्याचा इतिहास
उंदेरी किल्ल्यावर असलेल्या सिद्दीच्या सत्तेला शह देण्यासाठी १६५९ मध्ये शिवाजी महाराजांनी खांदेरी किल्ला बांधण्यास सुरुवात केल्यावर खुबलढा किल्ल्याला महत्त्व आले. खांदेरी किल्ल्यातील सैनिक व मजुरांना रसद, बांधकामाची इतर सामग्री पुरवण्याची जबाबदारी खुबलढा किल्ल्यावर होती. तसेच इंग्रज व सिद्दी यांच्यापासून संरक्षण करण्याची जबाबदारी खुबलढा किल्ल्यावर होती. थळचा किनारा उथळ असल्याने सिद्दीच्या होड्या किल्ल्याजवळ येऊ शकत नव्हत्या. त्यांना छोटा मचवा व पाडावातून यावे लागे. किनाऱ्यावर असणाऱ्या मराठ्यांच्या सैन्यात कोळी व भंडारी हे अतिशय चपळतेने छोट्या पाडावातून उंदेरीवर हल्ला करत आणि त्यांचा हल्ला चुकवत असत. १७४९ मध्ये सिद्दीने हा किल्ला जिंकला. पुढे १७५० मध्ये मानाजी आंग्रे याने हा किल्ला परत जिंकून घेतला. या युद्धात सिद्दीची २०० माणसे मारली गेली. पुढे मराठ्यांना खुबलढा किल्ल्याचे रक्षण करणे जिकिरीचे झाले. त्यामुळे त्यांनी किल्ला सोडून त्यावरील तोफा कुलाबा किल्ल्यावर पाठवल्या.
थळच्या किनाऱ्यावर थळ मच्छीमार संघटनेचे कार्यालय आहे. इथून खांदेरी, उंदेरी हे जलदुर्ग दिसतात.
मच्छीमार संघटनेच्या कार्यालयासमोर सिमेंटच्या ओट्यावर तसेच बांबूच्या कनाथीवर मासळी सुकवली जाते.
याच मासळीच्या गर्दीत पाच फूट उंचीच्या दगडांची चवड दिसते. ही चवड म्हणजेच खुबलढा किल्ल्याच्या बुरुजांचे अवशेष.
खुबलढा किल्ल्याचा आतील भाग संपूर्ण सपाट करून मासळी सुकविण्यासाठी सिमेंटचे ओटे बनविलेले आहेत.


























































