
नाशिकच्या येवला येथे हत्या झालेला ख्वाजा सय्यद चिश्ती ऊर्फ झरीफ बाबा याच्याबद्दल नवनवीन माहिती उघड होत आहे. झरीफ बाबा आणि त्याचे कुटुंब इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) म्हणजेच हेर खात्याच्या रडारवर होते. बॉलीवूड स्टार्स सलमान, शाहरूख आणि आमीर खानचे नाव वापरून तो कोटय़धीश बनला होता. त्यासाठी त्याने मॉर्फ केलेल्या व्हिडीयोंचा वापर केला होता. या बाबाला परदेशातूनही फंडिंग मिळत होते, असेही उघड झाले आहे.
झरीफ बाबा फक्त 35 वर्षांचा होता. तो मूळचा अफगाणिस्तानचा होता. तालिबानच्या भीतीने तेथून पळून तो हिंदुस्थानात शरणार्थी म्हणून राहत होता. दिल्ली, कर्नाटकनंतर त्याने महाराष्ट्र गाठून नाशिकच्या येवलामधील वावी गावात आश्रय घेतला होता. आपण अजमेरचे ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचे वंशज असल्याचे तो लोकांना सांगायचा.
बाबाच्या स्टाईलची भुरळ
झरीफ बाबाचे दिसणे, बोलण्याची शैली, त्याचे कपडे आणि वागण्याची पद्धत यामुळे सामान्य लोकांमध्ये त्याचे प्रस्थ वाढले होते. सूफी पोशाख घालून तो नाचायचा. झाडूच्या सहाय्याने महिला, लहान मुले आणि वृद्धांचे आजार बरे करण्याचा दावा करायचा. त्यामुळेच त्याला भेटण्यासाठी देशभरातून लोक येऊ लागले. काही धार्मिक संस्थांकडूनही त्याला मोठय़ा देणग्या मिळत होत्या.
इंटरनेटवर 25 लाख फॉलोअर्स
बॉलीवूडमधील ‘खान’ कंपनीच्या व्हिडीओंचा वापर करून झरीफ बाबाने सोशल मीडियावर आपले फॉलोअर्स वाढवले होते. आपण सुचवलेले उपाय केल्यामुळेच ही मंडळी स्टार्स बनली असा दावा हा बाबा करत होता. यूटय़ूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर त्याचे 25 लाख फॉलोअर्स होते.
2021 मध्येच आयबीला मिळाला होता रिपोर्ट
झरीफ बाबाला परदेशातूनही फंडिंग मिळू लागल्यानंतर तो आयबीच्या रडारवर आला होता. वावी पोलिसांनी 2021 मध्ये झरीफबरोबर त्याची पत्नी आणि ड्रायव्हर गफ्फार यांची चौकशी करून अहवाल आयबीला सोपवला होता.
4 कोटींची मालमत्ता, पत्नी अर्जेंटिनाची
झरीफ बाबाने चार वर्षांत चार कोटींची मालमत्ता कमावली होती. त्याने येवल्यात 15 एकर जमीनही खरेदी केली होती. त्याने मौल्यवान रत्ने विकण्याचा व्यवसायही सुरू केला होता. अर्जेंटिना येथील 28 वर्षीय तिरिना दाऊदी हिच्याबरोबर तो वावी गावातील मीरगाव शिवारात एका बंगल्यात राहत होता. तिरिना ही आपली पत्नी असल्याचे तो सांगायचा. तिरिनाकडे 2023 पर्यंत हिंदुस्थानी व्हिसा आहे.































































