
रिक्षा लाईनमध्ये उभी न केल्याची विचारणा केल्यामुळे एकाने दुसऱ्या रिक्षाचालकावर तलवारीने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना काल सकाळी नऊच्या सुमारास मार्केटयार्डमध्ये घडली. हल्ल्यात राजेंद्र मोहिते (वय – 52 ,रा. मार्केटयार्ड) जखमी झाले आहे. या प्रकरणी दोघा जणांविरूद्ध मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेंद्र मोहिते यांनी गुरूवारी सकाळी पावणे नऊच्या सुमारास मार्केटयार्ड गेट चारसमोरील स्थानकावर रिक्षा उभी केली होती. त्यावेळी आलेल्या दुसऱ्या चालकाने त्यांच्या पुढे रिक्षा उभी करून ‘माझ्यानंतर रिक्षा भाडे करायचे’, असे सांगितले. त्यामुळे राजेंद्रने त्याला ‘तुझी रिक्षा लाईनमध्ये लाव’, असे सांगितले. त्याचा राग आल्यामुळे आरोपीने रिक्षातून तलवार काढून राजेंद्रच्या डोक्यात वार केला. मात्र, त्यांनी वार अडविल्यामुळे तलवार नाकाला लागली. त्यानंतर आरोपीने साथीदाराच्या मदतीने त्यांना मारहाण करून गंभीर जखमी केले आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक भोसले तपास करीत आहेत.




























































