क्षणभर विश्रांती!

4096
being-with-you

>>ज्योत्स्ना गाडगीळ

घरात एक रुग्ण असला तरी सबंध घराला आजारपण येतं. त्यात रुग्ण दवाखान्यात भरती असेल, तर घरच्यांची आणखीनच तारांबळ उडते. अशा वेळी नातेवाईकांना हवा असतो मदतीचा हात! तो पुढे केला आहे, पुणे येथील ‘बिईंग विथ यू’ ह्या संस्थेने! समाजसेवेचा कालानुरूप नवा पैलू उलगडून सांगत आहेत, माधवी ठाकुरदेसाई.

रोजच्या धावपळीत म्हणा किंवा कामाच्या धबडग्यात म्हणा, प्रत्येकाला हवी असते, क्षणभर विश्रांती! पण ती मिळण्यासाठी आपल्याजागी दुसरा पर्याय द्यायला हवा. ही सामाजिक गरज ओळखून पुणे येथील `’बिईंग विथ यू’ ह्या संस्थेने तो पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे विभक्त कुटुंब, एकाकी व्यक्ती, रुग्णांचे नातेवाईक ह्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

`हम दो, हमारे दो’च्या चौकोनी कुटुंबात सुना, जावई, लेकी काळाची गरज म्हणून नोकऱ्या करतात. घरात ज्येष्ठ मंडळी किंवा लहान मुलं एकाकी असतात. एक वेळ लहान मुलांना पाळणाघरात ठेवता येते, पण ज्येष्ठ मंडळींना घरात एकटे ठेवणे, त्यांच्या सुरक्षेच्या, वयाच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने योग्य वाटत नाही. तेवढ्यासाठी वृद्धाश्रमाचा पर्यायही नकोसा वाटतो. अशा वेळी सोबतीला एखाद्या विश्वासू माणसाची गरज असते.

तसेच घरात आजारी व्यक्ती असली, की रुग्णाची सेवा करून दमलेल्या नातेवाईकांना थोडी विश्रांती हवी असते. त्यात मनुष्यबळ कमी असले, तर दवाखान्यात ये-जा करायला किंवा एक व्यक्ती निघून दुसरी व्यक्ती तिथे पोहोचेपर्यंत मधल्या काळात थांबायला व्यक्ती हवी असते, जिला आपण `रिलिव्हर’ म्हणतो, अशी आपल्यासाठी वेळ देणारी व्यक्ती प्रत्येकाला अडी अडचणीच्या काळात हवी असते. ही गरज लक्षात घेऊन `’बिईंग विथ यू’ संस्थेची निर्मिती करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत, माधवीताई…

`नोकरी, घर, संसार, छंद सांभाळून सुरुवातीपासूनच मी समाजसेवेत सक्रिय होते. मुंबईत असताना समाजसेवा करणाऱ्या अनेक संस्थांबरोबर काम करत होते. पुण्यात स्थलांतरित झाल्यावरही माझ्या कार्यात खंड पडला नाही. पुण्यात आल्यावर कैक वर्षांपासून माझ्या मनात असलेली एक कल्पना सत्यात आणता आली. ती कल्पना होती, `बिर्इंग विथ यू!’ नोकरीतून निवृत्त झालेल्या व्यक्ती, ६०-७० पर्यंतच्या व्यक्ती, गृहिणी यांच्याकडे पुरेसा वेळ असतो. तो वाया न घालवता इतरांच्या कामी लावता यावा, यादृष्टीने `’बिईंग विथ यू’चा प्रस्ताव मी माझ्या मित्रपरिवारासमोर मांडला. आपल्या दैनंदिन आयुष्यातले दोन ते तीन तास गरजू मंडळींना दिले, तर आपला वेळ सत्कारणी लागेल आणि त्यांची वेळ निभावता येईल. सर्वांना माझी कल्पना आवडली. ती सत्यात उतरवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले.’

`आपला हेतू स्वच्छ असला, तरी समोरच्या अनोळखी व्यक्तीला आपल्याबद्दल विश्वास वाटावा, आमच्या कार्यकर्त्यांना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागू नये, म्हणून आम्ही रितसर कायद्याचा आधार घेतला आणि सदर विषयाचे कंगोरे जाणून घेतले. शिवाय, ही सेवा देताना कोणकोणत्या कायदेशीर गोष्टींचे पालन केले पाहिजे ह्याचीही सविस्तर माहिती घेतली. लवकरच संस्था रजिस्टर होणार आहे. तसे झाले, की ज्येष्ठांसाठी आम्हाला आणखी उपक्रम राबवता येतील.’

२६ जानेवारी २०१९ रोजी माधवीतार्इंनी ह्या उपक्रमाची सुरुवात केली आणि काही काळातच त्यांच्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. जवळपास ३० कुटुंबियांनी ह्या उपक्रमाचा लाभ घेतला असून १५० जणांनी कार्यकर्ता म्हणून सेवा देण्याची तयारी दर्शवली आहे. पैकी संस्थेशी निगडीत ५० कार्यकर्ते उपक्रमात सक्रिय आहेत. हा उपक्रम पुण्यापुरता मर्यादित न राहता प्रत्येकाने आपल्या शहरात, विभागात राबवावा, असे माधवीताई सांगतात. आमची शाखा कुठेही नसली, तरी लोकहितासाठी अशा नवनवीन स्वयंभू शाखा सुरू झाल्या पाहिजेत, असे त्या कळकळीने सांगतात. त्यासाठी काही मदत, मार्गदर्शन, कायद्याचा सल्ला अपेक्षित असल्यास मी सदैव तत्पर असेन, अशीही माहिती त्यांनी दिली आहे. (संपर्क: ७२७६७९७१२४)

माधवी ताई सांगतात, `हा उपक्रम कोणीही कुठेही कधीही सुरू करू शकतो. फक्त तो करत असताना सर्वप्रकारे खबरदारी बाळगणे हिताचे ठरते. आपल्या मदतीने कोणाला फायदा झाला तर चांगलेच आहे, परंतु अनपेक्षितपणे काही अघटित घडले, तर त्याचे खापर आपल्या डोक्यावर फुटू नये, यासाठी सर्वतोपरी काळजी घ्यायला हवी. अन्यथा करायला गेलो एक आणि झाले भलतेच, असा अनुभव यायला नका़े सध्या मध्यम वयीन व ज्येष्ठांचा कार्यकर्त्यांमध्ये सहभाग असला, तरी तरुणांनी ही काळाची गरज ओळखून पुढे यावे, असे आवाहन करते.’

being-with-you-pune

सदर सेवा पुरवण्यासाठी संस्थेतर्फे केवळ दळणवळणाचे शुल्क आकारले जाते आणि तीन तासांची सेवा नि:शुल्क पुरवली जाते. ही सेवा देणाऱ्या कार्यकर्त्यांची सविस्तर माहिती संस्थेकडे नोंदवून घेतली जाते. त्याची शहानिशा करून मगच कार्यकर्त्यांना बोलावलेल्या ठिकाणी पाठवले जाते. कार्यकर्त्यांप्रमाणेच ज्या व्यक्तींनी बोलावले आहे, त्यांची सविस्तर माहिती, त्यांच्या रुग्णाची माहिती, नातेवाईकांचा संपर्क , आजाराची माहिती इ. आवश्यक गोष्टी नोंदवून घेतल्या जातात. रुग्णाबरोबर दोन ते तीन तासांची सोबत करणे एवढेच काम कार्यकर्त्यांनी करणे अपेक्षित असते. ही सेवा देणारे कार्यकर्ते स्वत:देखील साठीच्या पुढचे असल्याने त्यांच्याकडून अन्य कोणत्याही सेवेची अपेक्षा करता येत नाही आणि तसे करणेही धोक्याचे ठरू शकते. म्हणून `बिर्इंग विथ यू’ म्हणत हे कार्यकर्ते सोबत पुरवण्याचे काम करतात. संस्थेच्या कार्यकर्त्यांमुळे रुग्णांच्या नातेवाईकांना दिलासा व थोडी विश्रांती मिळावी ही सदिच्छा असते.

तसे असले, तरी सर्व कार्यकर्त्यांना प्राथमिक उपचाराचे प्रशिक्षण दिले जाते. जेणेकरून अडी-अडचणीच्या काळात कोणत्याही समस्या उद्भवणार नाहीत. सदर स्थळी जाताना कार्यकर्ते स्वत:चा खाण्याचा डबा आणि पाण्याची बाटली घेऊन जातात, त्यामुळे कार्यकर्त्यांकडून रुग्णाला किंवा त्याचा घरच्यांना कोणत्याही प्रकारची अडचण होत नाही.

माधवी ताईंनी दूरदृष्टीने उचललेले पाऊल नक्कीच समाजहिताचे ठरणारे आहे. ह्या कार्यात त्यांना नितीन ठाकुरदेसाई, श्रीरंग पाळंदे, अस्मिता पटवे, उपेंद्र पेंडसे ह्यांची साथ मिळत आहे. `भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे’ हे स्वामी समर्थांचे शब्द जसे दिलासा देतात, तसेच ‘बीइंग विथ यू’ हे माधवी ताईंच्या संस्थेचे शब्द लोकांना आधार देत आहेत. भविष्यात त्यांच्याकडून अन्यही चांगले उपक्रम घडत राहोत आणि आपल्याला त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळत राहो, ही सदिच्छा!

आपली प्रतिक्रिया द्या