
अख्खा देश दिला तरी सत्तेसाठी भाजप स्वार्थी झाला आहे. माणुसकी पूर्णपणे मोडून टाकली आहे. एका भगिनीला आशीर्वाद देण्याऐवजी सत्तेसाठी तुटून पडला आहे. मात्र, करवीरनिवासिनीसह शिवसेनाप्रमुखांचा आशीर्वाद आणि सर्व शिवसैनिकांचा पाठिंबा या लेकीला असल्याचे प्रतिपादन शिवसेना सचिव व खासदार विनायक राऊत यांनी केले. कोल्हापूरची स्वाभिमानी जनता भाजपचा उन्माद उतरवून ठेवेल, असा घणाघातही त्यांनी केला.
कोल्हापूर उत्तर मतदारसंघ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, माजी आमदार चंद्रदीप नरके, सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, सत्यजित पाटील, महिला संघटक शुभांगी पवार आदी उपस्थित होते.
खासदार विनायक राऊत म्हणाले, दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती. मात्र, सत्तेसाठी पिसाटलेल्या भाजपने ही निवडणूक लादली. सत्तेसाठी हपापलेल्या भाजपने 25 वर्षांपासूनची शिवसेनेची प्रामाणिक मैत्री तोडली. चंद्रकांत पाटील आणि फडणवीस यांनी हे पाप केले. दिलेला शब्द त्यांनी पायदळी तुडविला. बेईमान, कृतघ्नपणा आणि पाठीत खंजीर खुपसण्याचे त्यांचे काम जनतेने पाहिले आहे. शिवसेनेच्या साथीने पाच वर्षे तुम्ही मुख्यमंत्री झाला. आम्ही फक्त अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद मागितले. तुम्हाला साडेसात वर्षे घ्या म्हणून सांगितले. तरीपण भाजपवाले पलटले. देशाची 120 कोटी जनता, तुमचे पूर्वज ते खुद्द पंतप्रधान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुहृदयसम्राट म्हणून आदर करतात. त्यांना कुत्सितपणे जनाब म्हणवणाऱयांना जनाची आणि मनाची लाज उरलेली नाही. शिवसेनेचे हिंदुत्व हे व्यापक आहे. आपल्या देशाची सेवा इमानेइतबारे करणारे येथील सर्व हिंदूच आहेत. मात्र, मेहबूबा मुफ्ती यांच्याशी केलेली युती भाजपला कशी चालते, असा सवाल खासदार विनायक राऊत यांनी केला.
अरुण दुधवडकर म्हणाले, भाजपचे उद्दिष्ट आता सुज्ञ जनता बघत आहे. आज कश्मीरबाबत काही वाटत असेल तर मराठी भाषिकांचा बेळगाव सीमाप्रश्न का दिसत नाही? भाजपला त्यांची जागा दाखवायची असेल, तर कोल्हापूरवासीयांना या पोटनिवडणुकीतून उत्तर देण्याची संधी असल्याचे ते म्हणाले.
सीमाप्रश्नावर भाजपचा दुटप्पीपणा
सीमाभागात मराठी जनतेवर अत्याचार सुरू असून, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. त्यावरही येथील भाजपचे नेते मूग गिळून गप्प बसले आहेत. त्यामुळे विधानसभेत महाविकास आघाडी सरकारने केलेला निषेधाचा ठराव योग्यच आहे. सीमाप्रश्नासंदर्भात मराठी भाषिकांसाठी संसदेत महाराष्ट्राकडून आम्ही पत्र दिले. त्यावेळी भाजपने त्यावर सही करण्यास नकार दिला. यावरून भाजपचे सीमाभागातील मराठी माणसाबाबत धोरण दुटप्पीपणाचे असल्याचेही खासदार राऊत यांनी सांगितले.


































































