कोल्हापूर – रस्त्यावरच तलवारीने केक कापला, रोखणाऱ्या पोलिसांनाही धक्काबुक्की

1860

रात्री उशिरा रस्त्यात तलवारीने केक कापून आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करणाऱ्या सहा तरुणांवर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शंकर उर्फ अनुष्का बाबू देवगड (23) या तृतीयपंथी मित्रासह ऋषिकेश उर्फ गेंड्या बाबासो चौगुले (21),नितीन उर्फ दीपक घडीयल (20), अर्जुन बिरसिंग ठाकूर (21) आणि पंकज रमेश पवार (29) या पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर एक जण पळून गेला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री राजारामपुरी येथील नवश्या मारुती मंदिरा समोर भर चौकात काही तरुण तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करत असल्याची माहिती राजारामपुरी पोलिसांना मिळाली. त्यामुळे शीघ्र कृती दलाचे पोलीस कॉन्स्टेबल पंकज बारड आणि राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या तरुणांना हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र ऋषिकेश उर्फ गेंड्या चौगुले याच्यासह सहा जणांनी पोलिसांना धक्काबुक्की व शिवीगाळ केली. वातावरण तंग झाल्याने, पोलिसांचा आणखी फौजफाटा दाखल होताच, तरुणांनी पळ काढला.

कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असूनही हे तरुण रस्त्यात जमाव करून तलवारीने केक कापत होते. त्यामुळे संचारबंदीचे उल्लंघन, सार्वजनिक ठिकाणी धारदार शस्त्र घेऊन वावरणे तसेच पोलिसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी सहा जणांवर राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. यातील पाच जणांना अटक केली असून एकाचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नवनाथ घोगरे आणि पोलिस उपनिरीक्षक एस.एस.घुगे यांनी दिली.

दरम्यान हे संशयित पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. मारामारी, दमदाटीचे अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. या टोळीत तृतीयपंथीयाचाही समावेश असल्याचे समोर आल्याने, पोलिसांच्या चौकशीत या टोळीचे अनेक कारनामे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या