
शीतल धनवडे
सरकारी कर्मचाऱ्यांशी संगनमताने सरकारी हक्कातील जमिनीच्या सातबारा पत्रकात खाडाखोड करून, हेरे सरंजामच्या शेकडो एकर जमिनी धनदांडग्यांच्या घशात घालण्याचा प्रकार चंदगड तालुक्यातील सडेगुडवळे आणि पुंद्रा गावांमध्ये उघड झाली आहे. दीड-दोन वर्षांपूर्वी चर्चेत आलेल्या या प्रकरणात जानेवारी 2020 मध्ये चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या वर्षाच्या सुरुवातीपासूनच आर्थिक गुन्हा शाखेने याप्रकरणी केलेल्या कारवाईत निवृत्त सहायक फौजदार, तत्कालीन तलाठी तसेच, रेकॉर्डकिपर यांना अटक करून कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. यातील आणखी एक संशयित आरोपी नामांकित डॉक्टर असून, त्यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार आहे.
निवृत्त सहायक फौजदार अकबर आदम मुजावर (वय 68, रा. कसबा बावडा, कोल्हापूर), डॉ. संतोष कमलेश प्रभू (वय 60, रा. कसबा बावडा, नागाळ पार्क, कोल्हापूर) यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर तत्कालीन तलाठी विवेक धनराज भारती (वय 3 सध्या रा. गडहिंग्लज, मूळ रा. लातूर), तत्कालीन रेकॉर्डकिपर सुरेश गणपती कळेकर (रा, चंदगड) आणि नरसु आप्पुना गावडे (वय 35, रा. सोनारवाडी, ता. चंदगड) यांच्यावरही गुन्हे दाखल झाले आहेत.
चंदगड तालुक्यातील हेरे सरंजामच्या हजारो हेक्टर जमिनींपैकी सडेगुडवळे आणि पुंद्रा गावांतील शेकडो एकर जमिनी संबंधित तहसील कार्यालयातील तलाठी तसेच कर्मचाऱ्यांनी लाखो रुपये घेऊन, बेकायदेशीर खाडाखोड करून सातबारा पत्रकात धनदांडग्यांची नावे घुसडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार एका पत्रकाराने दीड वर्षांपूर्वी उघडकीस आणला होता. चंदगडच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घेत पोलिसांना गुन्हा दाखल करून तपासाचे आदेश दिले होते. 14 जानेवारी 2020 रोजी चंदगड पोलिसांत या गुन्ह्याची नोंद झाली आहे. तक्रारदाराला वकिलामार्फत धमकावण्याचे तसेच अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याची तक्रारही करण्यात आली आहे.
तत्कालीन महसूलमंत्री व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह संबंधित सर्व विभागातील अधिकारी यांच्याकडेही या प्रकरणाची तक्रार करण्यात आली होती. अखेर न्यायालयाने याची दखल घेऊन गुन्हा दाखल करण्याचे
अस्तित्वात नसलेल्या गटावरही घुसडवले नाव
आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांनी याप्रकरणी केलेल्या तपासात तलाठी विवेक भारती यांचा आणखी एक कारनामा उघडकीस आणला आहे. चंदगडमधील मिरवले गावातील ‘37 क’ हा अस्तित्वात नसलेला गट तयार करून, त्यावर एका धनदांडग्याचे नाव लावण्यात आले आहे. यासाठी तब्बल 79 लाख रुपये घेऊन त्याची नोटरीदेखील त्या धनदांडग्याला करून दिल्याचे समोर आले आहे.आदेश दिल्याने हा गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या आदेशाने हा गुन्हा आर्थिक गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आला होता.
लॉकडाऊनमुळे थांबलेला तपास पुन्हा सुरू
लॉकडाऊनमुळे थांबलेला हा तपास या वर्षाच्या सुरुवातीपासूनच पुन्हा सुरू झाला आहे. तत्कालीन तलाठी विवेक भारतीकडे केलेल्या चौकशीत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. याप्रकरणी जाणीवपूर्वक अभिलेख कक्षातील कागदपत्रे नष्ट केल्याचे, तसेच याबाबत संबंधितांची योग्य ती चौकशी करणे आवश्यक असल्याचा रिपोर्ट महसूल विभागाकडून नियुक्त चौकशी समितीने सादर केला आहे. सरकारी कागदपत्रांत आक्षेपार्ह खाडाखोड, बेकायदेशीरपणा तसेच महत्त्वाची कागदपत्रे फाडून, गुन्हा लपविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही या समितीच्या निष्कर्षातून पुढे आले आहे. तलाठी आणि रेकॉर्डकिपर यांच्या घरझडतीत अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे सापडली आहेत. कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांनीही संबंधित तलाठय़ाने पैसे घेऊन ही बेकायदेशीर कामे केल्याचे पोलिसांसमोर कबूल केल्याचे समोर आले आहे.





















































