कोल्हापुरात आता पुराची भिती! इशारापातळी ओलांडून पंचगंगा धोकापातळीकडे; जनजीवन विस्कळीत

जिह्यात सर्वत्र पावसाची संततधार आजही सुरूच राहिली. आज शहरात पावसाची किंचित उघडीप होऊन, सूर्यदर्शन झाले असले तरी दिवसभर संततधार पाऊस सुरूच राहिला. धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कायम राहिला. गेल्या 24 तासांत जिह्यात सरासरी 51.3 मि.मी. पाऊस झाला. तर, आज सकाळी अकराच्या सुमारास पंचगंगेने 39 फुटांची इशारा पातळी गाठली. यानंतर तासाला इंचाने वाढ होत असून, 43 फूट धोका पातळीच्या दिशेने पंचगंगा निघाली आहे. तसेच आगामी दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आल्याने जिह्याची वाटचाल पुराच्या दिशेने सुरू झाली आहे. यापूर्वीच्या महापुराचा अनुभव पाहता जिल्हा प्रशासनाकडून कोणताही धोका न पत्करता पूरबाधित भागातील नागरिकांना स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

गेल्या तीन-चार दिवसांपासून जिह्यात सर्वत्र पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे अवघा जिल्हा ओलाचिंब झाला आहे. पावसामुळे रस्त्यांना तळ्यांचे स्वरूप आले असून, अनेक ठिकाणी रस्त्यांची चाळण झाली आहे. ठिकठिकाणी रस्त्यात पावसामुळे मोठमोठे खड्डे पडले असून, त्यात साचलेल्या पाण्याचा अंदाज येत नसल्याने वाहनधारकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे जनजीवनावरही त्याचा परिणाम दिसून येत आहे. जिह्यातील राधानगरीसह दूधगंगा, वारणा, कुंभी, तुळशी, पाटगाव आदी मोठे धरण प्रकल्प हे 60 ते 85 टक्क्यांहून अधिक भरले आहेत. त्यातून विसर्गही मोठय़ा प्रमाणात होत असल्याने, सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होताना दिसत आहे.

जिह्यात जूनपासून आजअखेर 849.4 मि.मी. पाऊस

कोल्हापूर जिह्यात गेल्या चोवीस तासांत दुपारी बारापर्यंत सरासरी 51.3 मि.मी. पावसाची नोंद झाली. शाहूवाडी तालुक्यात सर्वाधिक 92 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर यंदा जूनपासून आज अखेर जिह्यात 849.4 मि.मी. पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. दरम्यान, 8.361 टीएमसी क्षमतेच्या राधानगरी धरणात सध्या 6.91 टीएमसी (82.70 टक्के) पाणीसाठा झाला आहे. यामधून विद्युतगृहातून 1450 क्युसेक विसर्ग सुरू आहे. 25.393 टीएमसी क्षमतेच्या दूधगंगा धरणात सध्या 15.63 टीएमसी (61.55 टक्के), 34.399 टीएमसी क्षमतेच्या वारणा धरणात सध्या 26.81 टीएमसी (77.94 टक्के) आणि 1592 क्युसेक विसर्ग सुरू आहे. तर 3.471 टीएमसी क्षमतेच्या तुळशी धरणात सध्या 2.48 टीएमसी पाणीसाठा असून, त्यात वाढ होत आहे.

81 बंधारे पाण्याखाली; 18 मार्गांवर एसटी बंद

ह सध्या नद्यांचे पाणी काठावरील शेतीत पसरले असून, नागरी वस्तीकडे घुसू लागले आहे. त्यामुळे सर्वत्र पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. जिह्यातील 81 बंधारे पाण्याखाली गेले असून, 8 राज्यमार्ग, 16 प्रमुख जिल्हा मार्ग, 6 इतर जिल्हा मार्ग आणि 14 ग्रामीण मार्गावरील वाहतूक बंद झाली होती. शिवाय मांडुकली येथे पाणी आल्याने कोल्हापूर-गगनबावडा, बाजारभोगाव, अनुस्करा येथे पाणी आल्याने कोल्हापूर-राजापूर, तर निळे पुलावर पाणी आल्याने कोल्हापूर-रत्नागिरी या मार्गासह अठरा मार्गावरील एसटी सेवा खंडित झाली आहे.

पंचगंगेत इचलकरंजीचा युवक वाहून गेला

येथील गणेशनगर भागातील अविनाश लक्ष्मण आपुगडे (वय 42) हा युवक पंचगंगा नदीत वाहून गेल्याची घटना घडली आहे. पुराच्या पाण्यात पोहण्यासाठी तो नदीत उतरला होता.

इचलकरंजीतील 40 जणांच्या ग्रुपने रुई बंधारा ते इचलकरंजी असा पंचगंगा नदीच्या पुरात पोहण्याचा उपक्रम घेतला होता. त्याप्रमाणे सर्वजण नदीच्या पाण्यात उतरले. मात्र, चंदूर गावानजीक आपुगडे हा दिसला नाही. यामुळे शोधमोहीम चालू केली. इचलकरंजीमधील आपत्ती व्यवस्थापनास कळविताच पथकप्रमुख संजय कांबळे यांनी व व्हाईट आर्मी ग्रुपने त्वरित बोटीतून शोध घेतला. मात्र, आपुगडे आढळून आला नाही. नदीच्या पाण्याला वेग असल्याने तो वाहून गेला असावा, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.