हातकणंगले मतदारसंघात 37 ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हापूर जिह्यात अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल

कोल्हापूर जिह्यात जाहीर झालेल्या 474 मधील बिनविरोधानंतर उर्वरित 429 ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज काही ठिकाणी धक्कादायक, तर काही ठिकाणी आश्चर्यकारक लागला. मोजक्याच ठिकाणी सत्तांतर झाले, तर काही ठिकाणी तीस-तीस वर्षांच्या एकाच गटाच्या सत्ता संपुष्टात आल्या. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात तब्बल 37 जागांवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सरपंच विजयी झाले आहेत. याशिवाय कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील अनेक ग्रामपंचायतींवर शिवसेनेची सत्ता आली आहे.

कागलमध्ये आमदार हसन मुश्रीफ गटाला समान जागा मिळाल्या. आमदार सतेज पाटील गटाने कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघासह गगनबावडय़ात आपले वर्चस्व राखले, तर जिह्यातील सर्वाधिक मोठी ग्रामपंचायत असलेल्या पुलाची शिरोलीमध्ये सत्तांतर होऊन महाडिक गटाला उभारी मिळाली. गडहिंग्लज, आजरा, राधानगरी, भुदरगड तालुक्यांत दहा ठिकाणी शिवसेनेचे सरपंच विजयी झाले आहेत. येथील 80 टक्के गावांत महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. निकालानंतर विजयी उमेदवार व या समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला.

कागल, गडहिंग्लज, आजरा विधानसभा मतदारसंघांत 46 पैकी 21 सरपंच राष्ट्रवादीचे, तर 30 सरपंचपदांवर महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी घेतली. राष्ट्रवादी-21, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – 6, काँग्रेस -1, शहापूरकर गट व राष्ट्रवादी आणि स्थानिक आघाडीला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. बोरवडे, करडय़ाळ व मुगळी व या तीन ग्रामपंचायतींत सरपंचपद विरोधी गटांकडे गेले असले, तरी येथे बहुमत मुश्रीफ गटाकडे राहिले आहे.

कागलमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी आमदार संजय घाटगे गटाचे व्हनाळी, बेलेवाडी, काळम्मा, हसूर बुद्रूक, आजऱयात भादवण अशा चार गावांमध्ये सरपंच झाले आहेत. कडगाव-गिजवणे जिल्हा परिषद गटात करंबळी ग्रामपंचायतची सत्ताही शिवसेनेने ताब्यात घेतली आहे. या मतदारसंघात एकूण 432 सदस्यपदांच्या जागांसाठी लढती झाल्या. त्यापैकी राष्ट्रवादीला 209 जागा मिळाल्या. शिवसेनेचे माजी आमदार संजय घाटगे गट – 47, शिंदे गट व खासदार संजय मंडलिक गट – 46, भाजप-99, काँग्रेस – 8, शेतकरी संघटना – 3, अनिल पाटील गट, जनता दल प्रत्येकी एक, तर डॉ. प्रकाश शहापूरकर गट – 6 आणि स्थानिक आघाडीला – 12 जागा मिळाल्या.

गगनबावडा तालुक्यात आमदार सतेज पाटील गटाने बाजी मारली असून, येथे 21पैकी तब्बल 19 ठिकाणी सरपंचपदावर विजय मिळाला आहे. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील 12 पैकी 10 ग्रामपंचायतींवर सतेज पाटील गटाची सत्ता आली आहे. शिरोळ तालुक्यात 17 पैकी 10 ग्रामपंचायतींवर यड्रावकर गटाने विजय मिळवला आहे.

चंदगडात शिंदे गटाला धक्का

कर्नाटक सीमेलगत महाराष्ट्रातील शेवटचे गाव असलेल्या चंदगड तालुक्यातील शिणोळी आणि तडसीनाळ गावात शिंदे गटाचे मंत्री व सीमाभाग समन्वयक शंभूराज देसाई यांनी प्रचार केलेल्या गावांची सत्ता महाविकास आघाडीकडे गेली. येथील हाजगोळी गावात सरपंचपदासह शिवसेनेचे संपूर्ण पॅनल निवडून आले.

प्रकाश आबिटकरांना स्वतःच्या गावातच दणका

शिवसेनेची गद्दारी करून शिंदे गटात सामील झालेल्या राधानगरी मतदारसंघाचे आमदार प्रकाश आबिटकर यांना त्यांच्याच गावात शिवसेनेने जोरदार दणका दिला आहे. येथे महाविकास आघाडीचा सरपंच विजयी झाला असून, येथील 17 पैकी 6 जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. उर्वरित 11 जागांवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. आमदार प्रकाश आबिटकर यांच्या पुढील आमदारकीच्या पराभवाची ही नांदी असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी सांगितले.

सत्ता नसतानाही मिळालेले जनमत आश्वासक – हसन मुश्रीफ

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने यश मिळवले आहे. राष्ट्रवादीला 50 टक्के यश मिळालेले आहे. भाजपला 22 ते 25 टक्के जनमत मिळालेले आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील सत्ता बदलानंतर महाविकास आघाडीची सत्ता नसतानाही मिळालेले 65 ते 70 टक्के हे जनमत आश्वासक असल्याचे आमदार हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

तरसंबळेतील एका केंद्रात फेरनिवडणूक

राधानगरी तालुक्यातील मौजे तरसंबळे येथील प्रभाग क्रमांक 3 मधील केंद्र क्रमांक 1च्या मतमोजणीत कंट्रोल युनिटमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे येथे फेरनिवडणूक घेण्यात येणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव के. सूर्यकृष्णमूर्ती यांनी कळविले आहे. आवश्यक असल्यास शुक्रवारी (दि. 23) मतदान घेण्यात येईल. निकाल घोषित करण्याचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱयांच्या मान्यतेने तहसीलदार निश्चित करतील, असे सूर्यकृष्णमूर्ती म्हणाले.