
सौंदर्य स्पर्धा सर्वत्र होत असतात. मात्र, रिक्षांच्या सौंदर्य स्पर्धा ऐकायला थोडे वेगळे वाटते. सर्वसामान्य नेहमीच रिक्षातून प्रवास करीत असतात. मात्र, आपण रिक्षाकडे फक्त प्रवासी वाहन म्हणून पाहतो. प्रवाशांचा सुखद प्रवास व्हावा, यासाठी काही हौशी रिक्षाचालक आपल्या रिक्षा अगदी कल्पकतेने सजविण्याचे काम करीत असतात. अशीच एक अनोखी राज्यस्तरीय स्पर्धा क्रांतिसूर्य फाऊंडेशनच्या वतीने पंढरपूर येथे घेण्यात आली होती. यामध्ये राज्यस्तरीय स्पर्धेत कोल्हापूरच्या रिक्षाने, तर जिल्हास्तरीय स्पर्धेत सोलापूरच्या रिक्षाने प्रथम क्रमांक पटकावला.
रिक्षांची ही अनोखी सौंदर्य स्पर्धा पाहण्यासाठी शेकडो हौशी नागरिकांनी महात्मा फुले चौकात मोठी गर्दी केली होती. यावेळी काही रिक्षाचालकांनी आपल्या रिक्षात फोन, एसी, कुलर, फ्रिज, लॅपटॉप, आरोग्य किट अशा सुविधांसोबत रिक्षा सजविण्याचे कामही केले होते.
या सौंदर्य स्पर्धेत पुणे, कोल्हापूर, सातारा, कराड, सोलापूर, सांगली अशा भागांतून पन्नासपेक्षा जास्त रिक्षाचालकांनी सहभाग घेतला होता. वेगवेगळ्या निकषांच्या आधारे स्पर्धेतील विजेते निवडण्यात आले.
या सजविलेल्या रिक्षांमध्ये काही रिक्षांनी टपावर किल्ले उभे केले होते, तर काहीजणांनी अतिशय सुखदायक आणि मऊ कुशन करण्यात आले होते. विजेत्या स्पर्धकांचा माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी नगराध्यक्ष नागेश भोसले, वामन बंदपट्टे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे
राज्यस्तरीय स्पर्धा ः पहिला क्रमांक कोल्हापूर येथील रिक्षाचालक तानाजी भोसले, दुसरा क्रमांक पुणे येथील संग्राम शिंदे आणि तिसरा क्रमांक विकास खराडे यांनी पटकावला. तर सोलापूर जिल्हास्तरीय स्पर्धेत पहिला क्रमांक सोलापूर येथील रिक्षाचालक विकी कोरे, दुसरा पंढरपूरमधील मोहन लाड व तिसरा क्रमांक येथीलच पिंटू फुलारे यांनी पटकावला.
या निकषावर आधारित ठरले स्पर्धेचे विजेते
सर्व स्पर्धकांनी आपल्या रिक्षा कशा ठेवल्या आहेत, किती वर्षांपूर्वीची रिक्षा आहे, प्रवाशांना कोणत्या वेगळ्या सुविधा दिल्या आहेत, आपल्या रिक्षात महापुरुषांचे कोणते संदेश दिले आहेत, अशा विविध चाचण्यांतून या सर्व रिक्षांची तपासणी परीक्षकांकडून करण्यात आली.
सांगलीच्या रिक्षाचालकाचा स्टंट लक्षवेधी
यावेळी सांगलीच्या एका रिक्षाचालकाने बहारदार स्टंट दाखवत प्रेक्षकांची मने जिंकली. कधी पुढचे चाक उचलून रिक्षा चालवायची, तर कधी वेगात दोन चाकांवर रिक्षा चालवायची. ताशी 50 किलोमीटर वेगाने रिव्हर्समध्ये रिक्षा चालवत अचानक कोणी आडवे आले तर लगेच रिक्षा जागेवर उभी करायची, असे स्टंट या सांगलीचे रिक्षाचालक यांनी करून दाखवले.



























































