जंगलतोडीचा फटका वन्यप्राण्यांना, कोकणात गेल्या सात वर्षांत 37 बिबटय़ांचा मृत्यू

leopard

कोकणात मोठय़ा प्रमाणावर होणारी जंगलतोड, वेगाने संपुष्टात येणारे जंगलातील नैसर्गिक जलस्रोत, शिकारीचे वाढते प्रमाण आणि यामुळे निर्माण झालेला वन्यप्राण्यांच्या भुकेचा प्रश्न या सर्वांचा फटका वन्यप्राण्यांच्या अधिवासाला बसत असून रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत बिबटय़ाचा अधिवास आणि भक्ष्य नष्ट होत असल्याने ते मानवी वस्तीत घुसण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत.

भक्ष्यांचा पाठलाग करताना बिबटे विहिरीत पडण्याचे प्रमाणही चिंताजनक असून गेल्या सहा महिन्यांत उत्तर रत्नागिरीच्या तुलनेत दक्षिण रत्नागिरीत बिबटे वारंवार सापडू लागले आहेत. जिह्यात गेल्या 7 वर्षांत विविध कारणांनी 37 बिबटे मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक आकडेवारी वनविभागाकडून प्राप्त झाली आहे.

कोकणातील बेकायदा शिकार आणि जंगलतोड यावर कायमची बंदी न आणल्यास बिबटय़ांसह अन्य जंगली प्राण्यांच्या मृत्यूचा आकडा दरवर्षी वाढत जाण्याची भीती वन्यजीव प्रेमींनी व्यक्त केली आहे. दररोज शेकडोंच्या संख्येत कोकणातून पश्चिम महाराष्ट्रात जाणारे जंगली जळाऊ लाकडाचे ट्रक या साऱयाचा परिणाम बिबटय़ांसह अन्य जंगली प्राण्यांच्या मृत्यूस कारणीभूत आहे. यावर कडक निर्बंध आणण्याची गरज असताना वनविभाग मात्र वृक्षतोडीचे परवाने देण्याच्या कामातच मग्न असल्याचे दिसून येते.

जिल्ह्यात केवळ 0. 8 टक्के राखीव वनक्षेत्र आहे. हे क्षेत्र सह्याद्रीच्या अतिदुर्गम भागात आहे. जिह्यातील बहुतांशी हिंस्त्र प्राणी याच क्षेत्रात आढळतात. वनविभागाकडे कर्मचाऱयांची कमतरता असल्याने या भागात गस्त घालणे अवघड होत असल्याचे या विभागाचे म्हणणे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या