राजापूरात पावसाचा कहर, नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। रत्नागिरी

वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपून काढले असून अर्जुना नदी आणि कोदवली नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे राजापूरमध्ये पूरस्थिती निर्माण झाला आहे. राजापूर शहरातील जवाहर चौक जलमय झाला आहे. रत्नागिरी तालुक्यातील काजळी नदीनेही धोक्याची पातळी ओलांडल्याने चांदेराई बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले आहे. पुरामुळे व्यापाऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. रत्नागिरी शहर आणि परिसरही जलमय झाला आहे.अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील जुवे परिसरात खाडीचे पाणी घुसले आहे. सोमेश्वर-चिंचखरी येथे खाडीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे रस्त्यावर पाणी आल्याने वहातुक बंद करण्यात आली आहे. गेल्या 24 तासात रत्नागिरी जिल्ह्यात 153.65 मिमी पाऊस पडला.

त्यामध्ये मंडणगड 170 मिमी, दापोली 225 मिमी, गुहागर 81 मिमी, चिपळूण 185 मिमी, संगमेश्वर. 180 मिमी, रत्नागिरी 113 मिमी, लांजा 170 मिमी आणि राजापूरात 120 मिमी पावसाची नोंद झाली.

जगबुडी पुलावरील वाहतूक बंद
खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने रविवारी दुपारी दोन वाजल्यापासून जगबुडी पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. जगबुडी नदीला येणाऱ्या पुरामुळे आता पर्यंत सुमारे 12 वेळा जगबुडी पुल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता.