बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मे.जिंदल साऊथ ॲण्ड वेस्ट स्टील लिमिटेड या कंपनीने चाफेरी येथे विनापरवाना 361 ब्रास जांभा दगडाचे उत्खनन केले. रत्नागिरी तहसीलदार कार्यालयाने जिंदल साऊथ ॲण्ड वेस्ट स्टील कंपनीला ठोठावलेला 91 लाखाचा दंडही जिंदल कंपनीने थकवला आहे. जिंदल कंपनीला तहसीलदार कार्यालयाने पुन्हा एक नोटीस काढून दंड भरण्याची चार दिवसाची मुदत दिली आहे.

चाफेरी येथे जिंदल साऊथ ॲण्ड वेस्ट स्टील कंपनीने जयविनायक मंदिराकडे जाण्यासाठी नवीन रस्ता करण्याकरीता विनापरवाना उत्खनन केले होते.जिंदल कंपनीने 361 ब्रास जांभा दगड या गौणखनिचाचे विनापरवाना उत्खनन केल्याचा ठपका ठेवत तहसीलदार कार्यालयाने जुलै 2019 रोजी जिंदल साऊथ ॲण्ड वेस्ट स्टील कंपनीला 91 लाख 69 हजार 400 रुपयांचा दंड ठोठवला होता. त्यामध्ये 361 ब्रास जांभा दगडाची किंमत 18 लाख 5 हजार रुपये होती. त्या किंमतीच्या पाच पट 90 लाख 25 हजार रुपये दंड, आणि 400 रुपयाप्रमाणे 361 ब्रासचे स्वामित्वधनाची 1 लाख 44 हजार 400 रुपये असा एकूण 91 लाख 69 हजार 400 रुपयांचा दंड ठोठवला होता.

तीन महिने उलटले तरी जिंदल कंपनीने दंडाचा अद्याप एक रुपयाही जमा केलेला नाही. जिंदल कंपनीने दंडाच्या नोटीसाला वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या होत्या. यामुळे तहसीलदार कार्यालयाने पुन्हा एकदा दंड वसुलीबाबतची नोटीस जिंदल साऊथ ॲण्ड वेस्ट स्टील कंपनीला काढली आहे. दंड भरण्यासाठी चार दिवसाची मुदत दिली असून दंड न भरल्यास कारवाईचा सज्जड इशारा प्रशासनाने दिला आहे.