
बारा गावच्या… बारा वेशीच्या… बारा बावडीच्या… बारा नाक्याच्या… बारा गल्लीच्या… बारा शहराच्या… देवा महाराजा… यंदा शिमगोत्सव मोजक्या लोकांतच साजरा करतत…कोरोनाची जी काय इडा-पिडा वाकडा नाकडा आसात त दूर कर रे महाराजा… होय महाराजा…
कोरोनाच्या सावटाखाली प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करत कोकणात शिमगोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला. यंदाच्या वर्षी शिमगा जल्लोषात साजरा करता आला नसला तरी कोरोनाचं संकट दूर करून पुढल्या वर्षी शिमगा जल्लोषात साजरी करण्याची संधी दे अशी प्रार्थना करत ग्रामदैवतेच्या पालखीसमोर भाविक नतमस्तक झाले.
रत्नागिरी जिल्ह्यात 1167 ठिकाणी सार्वजनिक आणि 3079 ठिकाणी खासगी होळ्या करण्यात आल्या. सोशल डिस्टन्सिंग आणि मर्यादित लोकांच्या उपस्थितीत शिमगा साजरा करण्यात आला.पालखीची प्रदक्षिणा गाडीतून करण्यात आली.त्याचबरोबर प्रदक्षिणेच्यावेळी नारळ, पेढे, ओटी व उलपे स्वीकारण्यात आले नाहीत.पालखी सहाणेवर बसल्यानंतरच सोशल डिस्टन्सिंग ठेऊन भाविकांना दर्शन देण्यात आले.
रत्नागिरीतील बारा वाड्यांचे ग्रामदैवत श्री देव भैरीबुवाची पालखी श्री गेली जोगेश्वरीच्या भेटीसाठी आणि ग्रामदक्षिणेसाठी रविवारी रात्री मंदिरातून बाहेर पडली. रथातूनच पालखीची ग्रामदक्षिणा करण्यात आली.झाडगाव येथील सहाणे भैरीबुवाची पालखी विराजमान झाल्यानंतर सोशल डिस्टन्सिंग ठेवत भाविकांनी दर्शन घेतले.शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करत शिमगा साजरा करण्यात आला. कोरोनाच्या संकटामुळे अनेक चाकरमान्यांनी शिमग्यासाठी गावी येणे टाळले. त्यामुळे ग्रामीण भागातील शिमगोत्सवही साधेपणाने साजरा झाला. केवळ परंपरेचे पालन करत काही ठीकाणी पालखी नाचविण्यात आली.अनेक ठीकाणी पालखी नाचविण्याचे कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. शिमगोत्सवात दरवर्षी जल्लोष करणाऱ्या मंडळींच्या उत्साहावर विरजण पडले.शिमगोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले. शासनाने सांगितल्याप्रमाणे प्रसाद वाटपही टाळण्यात आले. शिमगोत्सवात प्रशासनाच्या नियमांचे पालन होते का याकडे ग्रामकृतीदल आणि पोलीस पाटील लक्ष ठेऊन होते. शहरातही कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.




























































