
सामना प्रतिनिधी, शिरोळ
विश्रांती घेतलेल्या पावसाने शिरोळ तालुक्यात दमदार हजेरी लावल्यामुळे श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील कृष्णा व पंचगंगा या दोन नद्यांच्या पाणी पातळीत गेल्या चोवीस तासात तीन फुटाने वाढ झाली आहे.पाणी पातळी वाढलेने कृष्णा-पंचगंगा संगमावरील संगम मंदिर निम्याहून अधिक पाण्याखाली गेले आहे. तर नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिराजवळ कृष्णा नदीचे पाणी आले आहे. तसेच कुरुंदवाड सह परिसरात आज दिवसभर दमदार पाउस झालेने पेरणी करून पावसाची वाट पहात असलेला बळीराजा सुखावला आहे.
वाढलेल्या नदीच्या पाणी पातळीमुळे नदीकाठी असलेल्या गवताच्या शेतीत पाणी शिरत असून शेतकरी वर्गाची नदीकाठच्या मोटारी काढण्याची व नदीकाठी असलेले गवत कापून घेणेची धांदल चालू आहे. कृष्णा नदी पेक्षा पंचगंगा नदीच्या पाण्याला जोरात प्रवाह आहे. दरम्यान कृष्णा नदीचे पाणी वाढत असल्याने येथील दत्त देव संस्थानने मंदिर परिसरातील नदीकाठचे साहित्य सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे काम सुरू केले आहे.































































