ग्रॅच्युईटीसाठी 5 वर्षाची अट रद्द, कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही मिळणार फायदा

केंद्र सरकारने नोकरदार वर्गासाठी आनंदाची बातमी दिली आहे. सरकारकडून ‘सोशल सिक्युरिटी अँड ग्रॅच्युईटी’च्या नियमांमध्ये बदल करणारे नवे विधेयक संसदेच्या दोन्ही सदनात मंजूर झाले आहे. या बदलामुळे एखाद्या व्यक्तीला ग्रॅच्युईटीसाठी पात्र होण्यास एकाच कंपनीत सलग 5 वर्षे काम करावे लागण्याची अट रद्द झाली आहे. ग्रॅच्युइटी मिळवण्यासाठी पाच वर्षांची सीमा रद्द करण्यात आली असून यापुढे, कंपनीला प्रत्येक वर्षाला त्यांच्या कामगारांना ग्रॅच्युइटी द्यावी लागणार आहे. ग्रॅच्युईटी म्हणजे कर्मचाऱ्यांना ते ज्या कंपनीमध्ये काम करतात त्यांच्याकडून मिळणारी एकरकमी रक्कम असते. कर्मचाऱ्याने कंपनीला दिलेल्या सेवेच्या मोबदल्यात ही रक्कम त्याला दिली जाते.ग्रॅच्युईटी कायद्यातील तरतूदीनुसार कर्मचाऱ्याला 20 लाखपर्यंत ग्रॅच्युइटीची रक्कम मिळू शकते.

आत्तापर्यंत खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटीचा लाभ मिळवण्यासाठी सलग पाच वर्ष एकाच कंपनीत काम करणे बंधनकाक होते.  एखाद्या कारणामुळे कर्मचाऱ्याने नोकरीचा राजीनामा दिल्यास त्याला ग्रॅच्युइटीचा फायदा मिळत नव्हता. परंतु आता मात्र प्रत्येक वर्षी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटीचा लाभ मिळू शकेल. ज्या नोकरदारांना ठराविक कालावधीसाठी नोकरी दिली जाईल, म्हणजेच जे कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर नेमण्यात येतील त्यांना कंत्रातील कालावधीच्या दिवसांच्या आधारावर ग्रॅच्युइटी मिळण्याचा हक्कदेखील मिळणार आहे. हे कंत्राट कितीही दिवसांचे असले तरी कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळणार आहे.

ग्रॅच्युइटी कशी गणली जाते?

मूळ मासिक उत्पन्न (मूलभूत + डीए) X (15 /26) X कंपनीत किती वर्ष काम केले = ग्रॅच्युइटी.

उदाहरण द्यायचं झालं तर सुहास या कर्मचाऱ्याचे मूळ मासिक उत्पन्न 35000 रुपये असेल आणि त्याने जर कंपनीत सलग सात वर्षे नोकरी केली असेल तर त्याला या आकडेमोडीनुसार (35000) x (15/26) x (7)= 1 लाख 41 हजार 346 रुपये इतकी ग्रॅच्युईटी मिळेल

आपली प्रतिक्रिया द्या